एखाद्याच्या मृत्यूचेही राजकारण करणे, हा कोणत्याही राजकीय पक्षाचा अजेंडा असू शकत नाही:तानाजी खाडे


पिंपरी : निगडीतील भक्ती शक्ती उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात आमच्या कुटुंबातील ओमकार खाडे याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकारामुळे संपूर्ण खाडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आमच्या ओमकार सोबत घडलेला हा प्रकार पुन्हा कोणासोबतही घडू नये यासाठी महापालिका प्रशासन व महापालिकेतील सत्ताधारी पक्ष यांच्याकडून योग्य त्या उपाययोजना होणे अपेक्षित होते. परंतु असे न करता याउलट खाडे कुटुंबातील बळी गेलेल्या व्यक्तीच्या नावाचा वापर राजकारणासाठी केला जात असल्याने आम्ही उद्विग्न झालो आहोत.एखाद्याच्या मृत्यूचेही राजकारण करणे, हा कोणत्याही राजकीय पक्षाचा अजेंडा असू शकत नाही.त्यामुळे राजकारण करण्यापेक्षा पुलाच्या कामातील चुका दुरुस्त करा असे निवेदन माजी नगरसेवक तानाजी खाडे यांनी आयुक्त राजेंश पाटिल यांना दिले आहे
आमच्या कुटुंबातील सदस्य ओमकार शिवाजी खाडे याचा दि.११ जुलै रोजी निगडी उड्डाणपुलावर अपघात झाला होता. मागून आलेल्या भरघाव ट्रकच्या जोरदार धडकेत ओमकार जखमी झाला होता.त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.परंतु त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या प्रकारामुळे संपूर्ण निगडी विभागामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. उड्डाणपूल उभारताना झालेल्या अक्षम्य चुका,थरमॅक्स चौक,खंडोबा माळ तसेच आकुर्डीकडून निगडी-देहूरोडच्या दिशेने जाणारी चारचाकी वाहने,अवजड वाहने यांना आकुर्डी उड्डाणपूलाच्या मधल्या लेनला जाण्यासाठी कोणताही मार्ग न केल्याने अपघात घडत आहेत. याबाबत अनेक तक्रारी येऊन देखील कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. गतिरोधक,दिशादर्शक फलक,वाहतूक सिग्नल अद्यापही उड्डाणपुलावर नाहीत. या सर्व बाबींची पूर्तता काही दिवसात होणे अपेक्षित असताना मात्र महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक राजकीय श्रेय लाटण्यासाठी काम रखडवले गेले, यामुळे निगडी सहित अन्य ठिकाणाहून येणाऱ्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला आहे,यात अनेक वेळा अपघातही झालेले आहेत. हे संपूर्ण शहराने पाहिलेले आहे.
निवडणुका येतात- निवडणुका जातात,राजकीय स्टंटबाजी व प्रसिद्धी मिळविण्यासाठी अनेक जण धडपड करीत असल्याचे पाहायला मिळते. स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी तसेच राजकारण करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. परंतु एखाद्या अपघातात मरण पावलेल्या तरुणाचा वापर राजकारणासाठी करणे,हा कोणत्याही राजकीय पक्षाचा अजेंडा असू शकत नाही. त्यामुळे राजकारण थांबवून पुन्हा असे अपघात होऊ नयेत,यासाठी काय उपाय योजना करता येतील? याला प्राधान्य द्यायला हवे. या दुर्घटनेला राजकीय रंग देऊ नये. तरी खाडे कुटुंबियांच्या वतीने आपणास विनंती आहे की, ज्या चुक्या झाल्या आहेत,त्या ठिकाणांची पाहणी करून त्या तात्काळ दुरुस्त करून घेण्यासंदर्भात महापालिका प्रशासन व वाहतूक पोलीस यांची संयुक्त बैठक बोलावण्यात यावी. जेणेकरून या पुढील कालावधीमध्ये असा कोणताही अपघात होऊन एखाद्या कुटुंबावर अशी वेळ येऊ नये,एवढीच माफक अपेक्षा!