पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असतानादेखील व्यापाऱ्यांनाच बंदी का?

पुणे व्यापारी महासंघाकडून मंगळवारी दुपारी 12 वाजता घंटानाद आंदोलन करण्यात येणार असून सरकारनं ऐकलं नाही, तर बुधवारपासून दुपारी 4 नंतरही दुकानं सुरु ठेवण्याचा इशारा व्यापारी महासंघानं दिला आहे. कोरोना नियमांचं उल्लंघन केलं म्हणून व्यापाऱ्यांना जरी अटक केली, तरी आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा रांका यांनी दिला आहे. संध्याकाळी 7 वाजेपर्यत दुकानं सुरु ठेवण्याची परवानगी सरकारनं द्यावी, अन्यथा आम्ही ती उघडी ठेऊ, अशी भूमिका महासंघानं घेतली आहे.कोरोना लॉकडाऊनच्या काळात बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश व्यापाऱ्यांनी पाळले. आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असतानादेखील व्यापाऱ्यांनाच बंदी का घालण्यात येत आहे, असा सवाल पुणे व्यापारी महासंघान उपस्थित केला आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यापारी महासंघानं सरकारला निर्बंध हटवले नाहीत, तर व्यापारी परस्पर दुकानं सुरू ठेवतील, असा इशारा दिला आहे.

पुण्यातील विविध व्यापाऱ्यांकडे काम करणाऱ्या 1 लाख कर्मचाऱ्यांच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाल्याचं रांका म्हणाले. दुकानं बंद असल्यामुळे या कामगारांना पगार देणं व्यापाऱ्यांना शक्य होत नसल्याचं त्यांनी सांगितलं. व्यापारी सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण करून घ्यायलाही तयार असून सरकारने आम्हाला लस विकत घेण्याची तरी परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी महासंघानं केली आहे.

गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. त्यावेळी 16 व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या. आताही गेल्या 4 महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू असून व्यापाऱ्यांचे हाल होत  आहेत. इतर सर्व उद्योग सुरू असताना व्यापाऱ्यांनाच केवळ का बंदी घातली जाते, असा सवाल पुणे व्यापारी महासंघाच्या फतेचंद रांका यांनी उपस्थित केला आहेकोरोना टास्कफोर्स कधीही पुण्यात आली नाही. मग पुण्यातील रिपोर्ट कशाच्या आधारावर तयार करण्यात आले, असा सवाल महासंघानं उपस्थित केला आहे. ही टास्कफोर्स केवळ सरकारला घाबरवण्याचं काम करत असून पुण्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होऊनही निर्बंध का उठवले जात नाहीत, असा सवाल त्यांनी केला आहे

Latest News