पीएमपी चे दरवाजे बंद न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई

पुणे : पीएमपीच्या मार्गावर असणाऱ्या सीएनजी बसेसचे स्वयंचलित दरवाजे खुले राहत आहेत. यामुळे प्रवाशांचा गंभीर अपघात होण्याची शक्‍यता उद्भवत आहे. मात्र, याकडे अनेक चालक-वाहक दुर्लक्ष करतात. या पार्श्‍वभूमीवर दरवाजे बंद न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

मार्गावरील पर्यवेक्षकीय सेवकांनी सीएनजी बसेसचे दरवाजे खुले असल्यास चालक ‘एच कनेक्‍टर’ काढून स्वयंचलित दरवाजाचे ऑपरेटिंग करत नसल्यास, बसथांबा सोडून मार्गावर इतरत्र बसेसचे दरवाजे खुले असल्याचे आढळून आल्यास दोषी असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अहवाल वाहतूक व्यवस्थापक कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

, सीएनजी बसेसचे स्वयंचलित दरवाजे बंद आणि उघडण्याच्या सूचना देण्याबाबत आगार व्यवस्थापकांना आदेश दिले आहेत. याशिवाय, खासगी बस विभागाने सर्व खासगी बस ठेकेदारांना सूचना देण्याबाबत सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी बसमधून उतरताना पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या पार्श्‍वभूमीवर पुन्हा कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.मार्गावर संचलनात असणाऱ्या सीएनजी बसेसचे स्वयंचलित दरवाजे बंद ठेवणे आवश्‍यक आहे

. मार्गावर बस असताना प्रत्येक बसथांब्यावर बस थांबून दोन्ही स्वयंचलित दरवाजे उघडून प्रवाशांची चढ-उतार झाल्यानंतर खात्री केल्यानंतर दोन्ही दरवाजे बंद करणे आवश्‍यक आहे. यापूर्वीदेखील कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. मात्र, याकडे कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत.

मागील काही दिवसांपासून प्रवाशांची गर्दी होत असून, बस मार्गस्थ होताना दरवाजे बंद न केल्यास बसमधून खाली पडून गंभीर आणि प्राणांतिक अपघात होण्याची शक्‍यता असते.

जीव मुठीत घेत चढ-उतार
यापूर्वीदेखील बसमधून उतरतानाच अचानक बस पुढे गेल्याने एका महिलेचा प्राणांतिक अपघात झाला होता. याशिवाय प्रवासी बसमधून उतरताना चालक बस न थांबवता, बसचा वेग वाढवत असल्याचे प्रकार सर्रास घडत असतात. त्यामुळे कायमच बसमधून जीव मुठीत घेत चढ-उतार करावा लागत असल्याचे प्रवासी सांगतात.

Latest News