Pune FTI च्या सुवर्णमहोत्सवी पु.ल देशपांडे यांचे नाव झळकणार


पुणे :एफटीआयआयच्या दूरचित्रवाणी विभागाच्या इमारतीबाहेर पु.ल देशपांडे यांच्या भित्तीचित्राचे देखील अनावरण होणार असल्याची माहिती एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कॅथोला यांनी दिली
. याशिवाय दूरचित्रवाणी विभागातील दोन स्टुडिओना अनुक्रमे पी.कुमार वासुदेव आणि प्रा. वसंत मुळे यांचे नाव दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.भूपेंद्र कॅथोला म्हणाले, दूरचित्रवाणी विभागाची स्थापना १० ऑगस्ट १९७१ मध्ये झाली. त्याला 50 वर्षे पूर्ण होत आहेत.पुलंच्या ‘ व्यक्ती आणि वल्ली’, ‘ अपूर्वाई’, यांसारख्या अनेक पुस्तकांचे गारूड आजही वाचकमनावर कायम आहे. पु.ल देशपांडे यांनी मराठीमध्ये साहित्य निर्मितीसह नाटक, चित्रपट, आकाशवाणी’ या माध्यमांमध्ये लीलया मुशाफिरी केली
. त्यामुळे पु.ल देशपांडे यांचे नाव दूरचित्रवाणी विभागाच्या इमारतीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संस्थेचे माजी विद्यार्थी पी कुमार वासुदेव यांनी ‘ हम लोग’ ही मालिका दिग्दर्शित केली होती तर प्रा. वसंत मुळे हे एफटीआयआयच्या टेलिव्हिजन ट्रेनिंग सेंटरमध्ये शिक्षक होते.
फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ( एफटीआयआय) च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने दूरचित्रवाणी ( टीव्ही) विभागाच्या इमारतीवर महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पुरुषोत्तम लक्ष्मण उर्फ पु.ल देशपांडे यांचे नाव झळकणार आहे. ही पुलप्रेमींसह पुणेकरांसाठी नक्कीच अभिमानाची बाब ठरली आहे. विशेष म्हणजे, लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या उपस्थितीत उद्या ( दि.६) हा उदघाटन सोहळा रंगणार असून, एफटीआयआयच्या इतिहासात प्रथमच लष्करप्रमुख संस्थेला भेट देणार आहेत.
या सोहळ्याला ज्येष्ठ दिगदर्शिका आणि लेखिका सई परांजपे, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल, एफटीआयआयचे माजी संचालक आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे, ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, लेफ्टनंट जनरल जे.एस जैन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर ,राष्ट्रीय चित्रपट संग्रहालायचे प्रकाश मगदूम आणि पु.ल देशपांडे , पी कुमार वासुदेव आणि प्रा. वसंत मुळे यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहे.