अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला दत्तवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

पुणे : पुणे शहरातील कोथरूड परिसरातून रिक्षाने घरी चाललेल्या 16 वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षा चालकाला दत्तवाडी पोलिसांनी अटक केले. त्याचे रेखाचित्र तयार करून मार्गावरील तब्बल 100 सीसीटीव्हींचे फुटेज तपासून रिक्षा चालकाच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. अरविंद वामन घोलप (वय 60, रा. पर्वती) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पीडित मुलगी कोथरूड येथून दत्तवाडी परिसरात शनिवारी रात्री रिक्षाने घरी चालली होती. त्यावेळी दत्तवाडीतील गल्लीत रिक्षा थांबवून घोलप याने मुलीशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. त्यामुळे मुलीने त्याला धक्का देऊन ओरडत घराकडे पळ काढला होता. घरी जाऊन तिने हा सर्व प्रकार सांगितला.

याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून दत्तवाडी पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचर प्रतिबंधक कायदा व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी पथके तयार करून तपासाच्या सूचना दिल्या होत्या.

पोलिसांना रेखाचित्र प्रशिक्षण देणारे प्रा. गिरीष चरवढ यांना बोलवून रिक्षा चालकाचे रेखाचित्र काढले. संबंधित रेखाचित्र व पिडीत मुलीने सांगितलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज दत्तवाडी पोलिसांनी एकत्रित केले. सीसीटीव्हीमध्ये मिळालेल्या रिक्षा क्रमांकानुसार आरटीओकडून पडताळणी करण्यात आली. दरम्यान, अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा पर्वती भागातील असल्याची माहिती दत्तवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी विष्णू सुतार, पुरूषोत्तम गुन्ला आणि शिवाजी क्षीरसागर यांना मिळाली

. त्यानुसार दत्तवाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. ही कामगिरी अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे, डॉ. संजय शिंदे, उपायुक्त पौर्णिमा गायकवाड एसीपी गजानन टोम्पे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, कुंदन शिंदे, राजू जाधव, अमित सुर्वे, दयानंद तेलंगे, शिवाजी क्षीरसागर, शरद राउत, अक्षयकुमार वाबळे, नवनाथ भोसले, प्रमोद भोसले, विष्णू सुतार, राहूल ओलेकर यांनी केली.

Latest News