एसपीसीटी च्या वतीने महिलांना प्रशिक्षण व रोजगार मिळाले-पद्माताई भोसले


माजी खासदार कै. शंकरराव बाजीराव पाटील यांचा पंधरावा स्मृतीदिन निमित्त अभिवादन
पिंपरी, इंदापूर (दि. 13 सप्टेंबर 2021) माजी खासदार कै. शंकरराव बाजीराव पाटील यांच्या प्रेरणेने 2016 साली इंदापूर येथे शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टची (एसपीसीटी) स्थापना करण्यात आली. ग्रामिण भागातील महिलांना प्रशिक्षण आणि रोजगार तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण आणि आरोग्य मिळवून देणे हे प्रमुख उद्दिष्ठ ठेवून स्थापन झालेल्या या संस्थेतून आतापर्यंत आर्थिक दुर्बल घटकातील पाच हजारांहून जास्त महिलांना
मोफत प्रशिक्षण आणि दिड हजारांहून जास्त महिलांना रोजगार मिळवून देण्यात आले आहे. या मागे माजी खासदार कै. शंकरराव बाजीराव पाटील यांची प्रेरणा आहे असे प्रतिपादन ‘एसपीसीटी’च्या अध्यक्षा पद्माताई भोसले यांनी केले. माजी खासदार कै. शंकरराव बाजीराव पाटील यांच्या पंधराव्या स्मृतीदिनीनिमित्त इंदापूर येथे भोसले यांच्या हस्ते कै. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी एसपीसीटीचे विश्वस्त अरविंद गारटकर, अमोल राऊत तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते. पद्माताई भोसले यांनी सांगितले की, इंदापूर तालूका व परिसरात या ट्रस्टचे महिला सक्षमीकरणात मोठे योगदान आहे. संस्थेच्या आरोग्य केंद्रात आतापर्यंत 7830 ऊसतोडणी कामगारांची तसेच हजारो विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर कौशल्य विकास योजनेअंतर्गत नऊशेहून जास्त महिलांना मोफत व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले. कोरोनाच्या महामारीमुळे शैक्षणिक उपक्रम बंद होते. परंतू शंकरराव पाटील अक्षय शिक्षण योजनेअंतर्गत गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना ऑनलाईन तसेच सर्व शासकीय नियम पाळून ऑफलाईन कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. याचा पाचशेहून जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. यातील अनेक विद्यार्थी स्व:ताचा उद्योग व्यवसाय सुरु करुन आत्मनिर्भर झाले आहेत. तसेच दिनदयाळ उपाध्याय ग्रामिण कौशल्य विकास योजना ; महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास महामंडळ ; सारथी कौशल्य विकास योजना ; प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता अभियान आणि जावेद हबीब हेअर ॲण्ड ब्युटी ॲकेडमीच्या मान्यतेने महिला व विद्यार्थ्यांसाठी सतराहून जास्त विविध प्रकारचे व्यावसायिक अभ्यासक्रम वर्ग घेतले जातात. यातून महिलांचा व्यक्तीमत्व विकास होतो. तसेच महिला आर्थिक सक्षम होऊन कुटूंबाची आर्थिक जबाबदारी सक्षमपणे पार पाडतात. 2018 साली बारामती येथे ‘एसपीसीटी सायन्स ॲण्ड कॉमर्स ज्युनिअर कॉलेज’ ची स्थापना करण्यात आली. या ठिकाणी ग्रामिण भागातील हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्तीची सुविधा देण्यात येते. तसेच कमवा शिका योजने अंतर्गत कॉम्प्युटर व सॉफ्टस्किल कोर्सेस घेण्यात येतात. शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात ‘एसपीसीटी’ पुढील काळात आणखी मोठे उद्दिष्ठ ठेवून नियोजन करण्यात येत आहे अशीही माहिती पद्माताई भोसले यांनी दिली.