बार्टी संस्थेतील बंद कोर्स पुन्हा चालू करा. ठाकरे सरकारने अनुदान द्यावं

पुणे : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी अंतर्गत एकूण 59 प्रकारच्या योजना चालवल्या जातात. यातील बहुतांश योजना सध्या अडचणीत आलेल्या आहेत. या 59 योजनांपैकी काही योजना या फक्त अनुदान न दिल्यानं बंद अवस्थेत आहेत.

त्यामुळे आता स्टुडंट हेल्पिंग हॅंडचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राजकारण्यांच्या हजारो कोटीच्या शिक्षणसंस्था कोरोना असला तरी चालतात. त्यांना निधी मिळतो पण बार्टीच्या वेळी घोडे अडते कुठं?, असा सवाल कुलदीप आंबेकर यांनी उपस्थित केला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आल्या आहेत.

तर अनेक सरकारी संस्थेचं कामकाज देखील ठप्प झाल्याचं दिसतंय. कोरोना काळापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अंतर्गत येणारे बरेच कोर्स बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे आता या संस्थेला सरकारने अनुदान द्यावं आणि संस्थेतील बंद झालेले कोर्स पुन्हा चालू करावेत, यासाठी स्टुडंट हेल्पिंग हॅंडने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

संचालक बदलतात तशी त्यांच्या दृष्टिकोनानुसार बार्टीची धोरणेही बदलतात, असं निरीक्षण आहे. याची झळ आणि गैरसोय मात्र विद्यार्थी आणि संस्थांना बसतीय. कोरोनाच्या नावाखाली अनुदान रोखून अशा महत्त्वापूर्ण योजना बंद पडत असतील किंवा त्या पाडायच्याच असतील तर सरळ बार्टी ही स्वायत्ता संस्था बंदच करा. उगीच असले बेगडे प्रेम आमच्यावर कशाला दाखवता?, अशी टीका देखील त्यांनी सरकारवर केली आहे

.दरम्यान, बार्टी मुळ ध्येय धोरणापासून ही संस्था भरकटत चाललीय. या सगळ्याला वेळेतच वेसन घालण्याची गरज आहे. सर्व विद्यार्थी वर्गाने एक होऊन या विरोधात उभे राहिले पाहिजे. अन्यथा ही संस्था बंद पडायला वेळ लागणार नाही. या संस्थेला वाचवायचं असेल, असं म्हणत कुलदीप आंबेकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

बंद पडलेल्या बार्टीच्या काही योजना-

1) 15% मध्ये मिळणारे महामानवाचे दुर्मिळ ग्रंथ,संविधान प्रत असे विविध पुस्तकांचा उपक्रम कोरोनामुळे अनुदान नसल्याचे कारण देत बंद केला आहे.

2) बार्टीचा कणा म्हणुन ओळखी जाणारी ‘कौशल्य विकास योजना’ देखील निधी अभावी बंद आहे.

3)सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठात ‘डॉ.आंबेडकर स्टडिज’ डिपार्टमेंटला विविध कोर्सेस बार्टीच्या संयुक्त विद्यामानाने सुरू केले, त्यासाठीचा निधीही बंद केला आहे. अशावेळी हे कोर्सेस चालणार कसे ?

4) पुणे विद्यापीठातील पाली विभागाला बार्टीकडून मिळणाऱ्या अनुदानालाही कात्री लावली आहे. याठिकाणी चालणारे पाली त्रीपीटीका मराठी भाषांतर बंद.

Latest News