मुख्यमंत्री फक्त भाषणाने शेतकऱ्यांचे पोट भरत नाही: राजू शेट्टी

जालना : एफआरपीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला धारेवर धरलं. “केंद्र सरकारने एफआरपीचे तुकडे करण्याचा घाट घातला आहे. त्याला राज्य सरकारने संमती दिली आहे. एरव्ही केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांना बघून घेण्याची भाषा करतात. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट करताना केंद्र आणि राज्य सरकार एकत्र येतात,” शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री फक्त भाषण करतात. भाषणाने शेतकऱ्यांचे पोट भरत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तत्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी असा गंभीर आरोप शेट्टी यांनी केला.

लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडावर बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खेळाडूंना भेटण्यासाठी व बोलण्यासाठी वेळ आहे. मात्र मागील अनेक दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या आणि शहीद झालेल्या शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, असे राजू शेट्टी म्हणाले.

तसेच “पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारने मदत करताना गांभीर्य दाखवले नाही. विमा कंपन्या शेतकऱ्यांना फसवत आहेत. या कंपन्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे खोटे रेकॉर्ड करत आहेत. शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर करताना पैशाची मागणी करतात. पीकविमा कंपन्यांच्या माध्यमातून दरोडा टाकण्याचे काम होत आहे. मग या दरोड्यामध्ये राज्य आणि केंद्र सरकारचा हिस्सा आहे का ?” दरम्यान, पुढे बोलताना शेतकऱ्यांवर दरोडे टाकत असाल तर आपण गप्प बसणार नाही. मोठी लढाई छेडणार, असा इशारादेखील राजू शेट्टी यांनी राज्य आणि केंद्र सरकारला दिला.