डी. एस. कुलकर्णी यांच्या बंगल्यात दरोडा 7 लाखांचा ऐवज लुटला

पुणे : हजारो गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक करणाऱ्या डी. एस. कुलकर्णी यांच्या बंगल्यात दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली आहे.चोरट्यांनी बंगल्यातील अनेक महागड्या वस्तू लंपास केल्या आहेत. विशेष म्हणजे हा बंगला ED अर्थातच सक्तवसूली संचालनालयाच्या ताब्यात होता. डी. एस. कुलकर्णी यांनी हजारो गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर, ED ने कारवाई करत हा बंगला ताब्यात घेतला होता.
तेव्हापासून हा बंगला बंदच होता. चोरट्यांनी या बंद बंगल्यावर डल्ला मारून बंगलातील महागड्या वस्तू लंपास केला आहे. याप्रकरणी भाग्यश्री अमित कुलकर्णी (वय 37) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे
. डी. एस कुलकर्णी यांनी पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिराजवळ 2006 साली एक भव्यदिव्य 40 हजार चौरस फुट बांधकाम असलेला सप्तश्रृंगी नावाचा बंगला बांधला होता. जुन्या पद्धतीने बांधलेला हा बंगला वैशिष्ट्येपूर्ण होता. पण डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर, ED ने कारवाई करत डीएसके यांचा हा आलिशान बंगला आपल्या ताब्यात घेतला होता.
त्यानंतर मागील काही वर्षांपासून हा बंगला बंदच होता.असं असताना 16 ऑक्टोबर 2019 ते 11 ऑक्टोबर 2021 दरम्यान या बंगल्यात चोरी करण्यात आली आहे. अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या दरवाजाचं लॉक आणि सिल तोडून बंगल्यामधील 6 लाख 95 हजार असा जवळपास 7 लाखांचा ऐवज लुटला आहे. यामध्ये बंगल्यातील 8 एल ई डी टीव्ही, कॉम्प्युटर, 3 सीडी प्लेअर, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू, देवघरातील चांदी, कॅमेरा, गिझर, पिठाची गिरणी अशा महागड्या वस्तू चोरून नेल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.
बंगल्यात चोरी झाल्याचा संशय आल्याने फिर्यादी भाग्यश्री कुलकर्णी यांनी ED चे अधिकारी, पोलीस आणि पंच यांच्या समक्ष बंगल्यात जाऊन पाहणी केली आहे. त्यानंतर चतु:श्रृंगी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. हजारो गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीच्या घरात जबरी चोरी झाल्याने, हा प्रकार परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.