इकोमक्स गो (इं) या स्टार्टअप कंपनीच्या अभिनव योजनेला स्थायी समितीने मान्यता

‘पुणे : पुणे शहरात सार्वजनिक ठिकाणी दहा वर्षे मुदतीसाठी तीन वर्षांच्या कालावधीत चाळीस मशिन्स टप्प्याटप्प्याने बसविण्यात येणार आहे. घरात तसेच बाहेर वापरलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, काचेच्या बाटल्या, धातूचे कॅन्स, प्लॅस्टिक रॅपर असा कचरा तुम्ही बाहेर फेकत असाल तर आता तुमच्यासाठी हा कचरा फायदेशीर ठरणार आहे. अशा फेरवापर होऊ शकणाऱ्या कचऱ्याचे संकलन करण्यासाठी शहरात ‘स्वच्छ एटीएम’ बसविण्यात येणार आहे. या मशिन्समध्ये कचरा टाकल्यानंतर नागरिकांच्या बॅंक खात्यावर ऑनलाइन पद्धतीने ठरलेल्या दराप्रमाणे पैसे जमा होणार आहेत. इकोमक्स गो (इं) या स्टार्टअप कंपनीच्या अभिनव योजनेला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
ज्या ठिकाणी ही मशिन्स बसविली जाणार आहेत त्यासाठी 24 तास मोफत वाय-फाय, नवीन बॅंक खाते उघडण्याची सोय, नवीन सिम कार्ड खरेदी, सिनेमा, लोकल, रेल्वे, बसेसच्या तिकिटांची खरेदी, फी भरणे, पैसे पाठविणे अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत
. एटीएममध्ये जमा होणार्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे. एटीएमची उंची 6 फूट आणि रुंदी 4 फूट असणार आहे. या मशिनमध्ये तीन स्क्रिन असणार आहेत. पुढील स्क्रिनवर मशिन वापणऱ्याची माहिती, महापालिकेच्या जाहिराती, अन्य कंपन्यांच्या जाहिराती असणार आहेत. दक्षिण दिल्ली, उत्तर दिल्ली, वाराणसी या ठिकाणी या मशिन्स कार्यान्वित आहेत
.
या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी या मशिनमध्ये नागरिकांनी आपल्या मोबाइल क्रमांकाद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर कचऱ्याचा कुठला प्रकार निवडायचा आहे, त्याची माहिती द्यावी लागणार आहे. प्लॅस्टिकच्या एका बाटलीसाठी 1 रुपया, काचेच्या बाटलीसाठी 3 रुपये, धातुच्या कॅनसाठी प्रत्येकी 2 रुपये आणि प्लॅस्टिक रॅपर्ससाठी प्रत्येकी 20 पैसे कचरा टाकणाऱ्याच्या बॅंक खात्यात जमा होणार आहेत.’