अभिजित कोसंबी, मुग्धा वैशंपायन, अश्विनी कुर्पे, मंगेश चव्हाण, राजू जाधव यांच्या गायनाने गुलाबी थंडीत रसिक मंत्रमुग्ध

अभिजित कोसंबी, मुग्धा वैशंपायन, अश्विनी कुर्पे, मंगेश चव्हाण, राजू जाधव यांच्या गायनाने गुलाबी थंडीत रसिक मंत्रमुग्ध

कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व राजेंद्र जगताप मित्र परिवारा तर्फे दिवाळी पहाटचे आयोजन

पिंपरी, प्रतिनिधी :

पिंपळे गुरव येथे कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व माजी नगरसेवक राजेंद्र जगताप मित्र परिवाराच्या वतीने आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमात गायक अभिजित कोसंबी, लिटिल चॅम्प गायिका मुग्धा वैशंपायन, अश्विनी कुर्पे, आंतरराष्ट्रीय पार्श्वगायक राजू जाधव, मंगेश चव्हाण यांनी रसिकांना सकाळच्या प्रहरी गुलाबी थंडीत मंत्रमुग्ध केले. रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौक येथील कै. काळूराम जगताप बॅडमिंटन हॉल शेजारील मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आयोजक राजेंद्र जगताप, मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, माजी नगरसेवक राजू लोखंडे, अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे शहराध्यक्ष विजूआण्णा जगताप, माजी महापौर शकुंतला धराडे, नगरसेविका स्वाती काटे, संदीप राठोड, ह.भ.प. राघव चैतन्य महाराज, सुदाम ढोरे, मारुतराव साळुंके, ऍड. बाजीराव दळवी, ऍड. आशुतोष काशीकर, ऍड. प्रिया देशमुख, सूर्यकांत खेडकर, गायक किरण पवार, विश्वनाथ शिंदे, सामजिक कार्यकर्ते बापूसाहेब ढोरे, प्रकाश शितोळे, बळीराम जाधव, सुनील कदम, राजेंद्र कुंवर, रुपाली ढोकळे, संतोष देवकर आदींसह भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघ, संत गाडगेबाबा जेष्ठ नागरिक संघ, पितामह भिष्माचार्य जेष्ठ नागरिक संघ, आनंद जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, पिंपळे गुरव, सुदर्शन नगर, नवी सांगवी, जुनी सांगवी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवाळी पहाटची सुरुवात गणेशवंदनेने झाली. त्यानंतर अभिजितने सूर निरागस हो.. गीत गात वातावरण आणखी आल्हाददायक बनविले. मुग्धाने बोलावा विठ्ठल, अभिजितने प्रभू तू दयाळू, माझी विठाई माऊली, अश्विनी कुर्पे यांनी ऐरणीच्या देवा तुला हे गीत गात कार्यक्रमात रंगत आणली. मंगेश चव्हाण यांनी मन उधान वाऱ्याचे गीत गात टाळ्यांची दाद मिळविली. यानंतर अभिजित व श्रावणी यांनी मला वेड लागले प्रेमाचे हे युगुल गीत गात रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळविली. राधिकेचं कृष्णावर असलेलं प्रेम मुग्धाने मी राधिका.. मी प्रेमिका म्हणत रसिकांना मंत्रमुग्ध केले. अभिजितने सुख में सब साथी गात रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. अश्विनीने ही गुलाबी हवा वेड लावी जीवा या गाण्याने गुलाबी थंडीत रंग भरले. राधा ही बावरी गीत गात अभिजितने रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळविली. आले रे आले नगरसेवक राजेंद्र जगताप आले या मंगेश यांनी स्वरचित गीतातून जगताप यांच्या कार्याची महती गायली.

मुग्धाने गायलेल्या उगवली शुक्राची चांदणी लावणीवर रसिकांना ठेका धरायला भाग पाडले. याला टाळ्या व शिट्ट्यांची उत्स्फूर्त दाद मिळाली. ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांचे गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय, हे अभिजित व अश्विनी यांनी गायलेल्या गाण्याला रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. या गाण्याचे उत्स्फूर्त स्वागत केले. अभिजितने आई भवानी गोंधळाला ये गाण्यावर वातावरण भारावून टाकले.

राजकारणात सुडाची भावना नको; राजेंद्र जगताप यांनी राजकारणात मोठमोठी पदे पादाक्रांत करावीत : ज्येष्ठ अभिनेत्री आशाताई काळे

     कोरोना काळात जीव वाचविण्यासाठी राजेंद्र जगताप यांनी कोविड केअर सेंटर उभे केले होते, ते स्तुत्य आहे. मात्र, त्यात अडथळे आणून ते बंद करण्यात आले, हे चुकीचे आहे. कोरोना लवकर जावा. त्यामुळे कोविड सेंटरची गरजच भासणार नाही. राजकारण करीत असताना सुडाची भावना नको, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांनी केले.
      आशा काळे पुढे बोलताना म्हणाल्या, की राजकारणात चांगली माणसे दुर्मिळ झाली आहेत. राजेंद्र जगताप नक्की यश मिळवतील आणि एकेक टप्पा पादाक्रांत करतील. इथले नागरिकही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहतील, असा आपणाला विश्वास आहे. जे चांगलं कराल त्याच्यासोबत परमेश्वर असतोच. आजची सुंदर पहाट कित्येक वर्षांनी अनुभवली. कारण आमची झोपच पहाटे सुरू होत असते. आज बरे वाटले. मुग्धा, अभिजित यांनी गोमू संगतीनं... खूप छान गायले. या गीताविषयी अनेक आठवणी आहेत. 
      गेल्या 50 वर्षात नाटकाचे खूप प्रयोग केले. त्यावेळी आजसारख्या सोयीसुविधा नव्हत्या. केवळ देवळातली गाणी, सणाची गाणी, अंगाई गीते माझ्यावर चित्रित होत. प्रेमगीत माझ्या वाट्याला आली नाहीत, याची खंत आहेच. पण प्रेक्षकांना मी तसेच आवडायचे. प्रेमगीते काय आज आहेत, उद्या नसतील. अंगाई गीते अजरामर राहतील, असेही आशा काळे यांनी सांगितले.
    राजेंद्र जगताप यांनी प्रास्ताविक करीत कोरोना काळात केलेल्या कार्याचा आढावा घेतला व इथून पुढेही समाजातील प्रत्येक घटकाला मदत करण्याचे आश्वासन दिले. 
   भाऊसाहेब भोईर यांनी राजेंद्र जगताप यांच्या कामाची प्रशंसा केली. पिंपळे गुरव मधील निळूफुले नाट्यगृह बांधण्याच्या कामात अग्रेसर भूमिका घेतल्याबद्दल धन्यवाद दिले व कलाकार नेहमीच पाठीशी राहतील, असे सांगितले.

Latest News