दीपावली निमित्त आयोजित किल्ले बनवा स्पर्धेतील विजेत्यांचा चषक व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपळे गुरव विभागाच्या वतीने आयोजन
लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड पिंपळे गुरव विभाग यांच्या वतीने मराठवाडा जनविकास संघाचे मुख्य कार्यालय येथे दीपावलीनिमित्त किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील 45 स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेतील विजेत्यांना चषक, स्मृतिचिन्ह व मिठाई देऊन गौरविण्यात आले.
माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष तानाजी जवळकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप, युवा नेते अमरसिंग आदियाल, उद्योजक बालाजी पवार, गणेश जगताप, अस्मिता कांबळे, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे, सुभाष जाधव नितीन चौधरी यांच्या हस्ते किल्ले स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक सुशांत रेसीडन्सी,भगत सिंग चौक येथील जयकुमार जाधव, साक्षांत खराबी, करण चव्हाण, श्रीजल गायकवाड, सार्थक संनक, मल्हार जाधव, साईराज जाधव, श्रेया चव्हाण, शुभ्रा चव्हाण, प्रणाली चव्हाण, मनिष पटेल, चिराग चव्हाण, गणेश मुंगळे, समिर काशिद यांनी पटकावला.द्वितीय क्रमांक सिंहगड कौलनीतील आदित्य पाटील, समर्थ देवकाते, अथर्व शेंडगे, आदित्य भालेराव, शैलेश दौंड, वेदांत पाटील, आयुष शेंडगे, राजवीर पाटील या मुलांनी पटकावला. तर तृतीय क्रमांक कबीर बडे (कल्पतरू सोसायटी, जवळकरनगर) यांनी मिळवला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष तानाजी जवळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले, की आज मुलांमध्ये किल्ल्यांची आवड निर्माण होत आहे, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. या माध्यमातून प्रत्येकाला गड-किल्ल्यांची माहिती होईल. पालकांनीही मुलांना गड-किल्ल्यांची माहिती देऊन मुलांना गड-किल्ल्यांची सहल घडवून आणणे आवश्यक आहे. यामुळे आपल्या वीर पुरुषांची माहिती होईल. तसेच मुलांमध्ये इतिहासाची आवड निर्माण होण्यास मदत होईल. गड किल्ले जपणे ही आपली जबाबदारी आहे. याबरोबरच मुलांना कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या खेळाची आवड निर्माण व्हावी, यासाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही तानाजी जवळकर यांनी सांगितले.