पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेला प्रभागरचना तयार करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून सहा दिवसाची मुदतवाढ

पुणे : राज्य निवडणूक आयोगाने पुणे, पिंपरी-चिंचवड व अन्य सहा महापालिकांना प्रभागरचनेचा कच्चा प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती. या कालावधीत हा कच्चा आराखडा गोपनीयरीत्या निवडणूक आयोगाला सादर करायचा होता. मात्र, पुणे महापालिकेला हा कच्चा आराखडा तयार करण्यास विलंब होत असल्याने आयुक्त विक्रमकुमार यांनी आयोगाकडे 15 दिवसांची मुदतवाढ मागितली होती.पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेला प्रभागरचनेचा कच्चा प्रारूप आराखडा सादर करण्यासाठी पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 6 डिसेंबरपर्यंत हा प्रारूप आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करायचा आहे.

आयोगाने यापूर्वी दिलेली मुदत मंगळवारी संपुष्टात येत असल्याने मुदतवाढ मिळणार की नाही, याबाबत उत्सुकता होती. मात्र, आयोगाने सोमवारी पुण्यासह पिंपरी-चिंचवड आणि औरंगाबाद या तिन्ही महापालिकांना पाच दिवसांची मुदतवाढ दिली.

त्यानुसार या पालिकांनी 5 डिसेंबरपर्यंत प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करायचा असून, तो 6 डिसेंबरला निवडणूक आयोगाकडे सादर करावा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी दिले आहेत. त्यामुळे आता महापालिकेला पुढील पाच दिवसांत हा कच्चा आराखडा तयार करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले

प्रभागरचना तयार करण्याचा कालावधी वाढल्याने आता आधीच विलंब झालेली प्रभाग रचनेची प्रक्रिया आणखी रेंगाळली आहे. प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर त्यावरील हरकती-सूचनांची कार्यवाही आणि त्यानंतर अंतिम प्रभागरचना जाहीर होण्यासाठी नववर्ष म्हणजेच जानेवारी महिना उजाडण्याची शक्यता आहे. त्यातच निवडणुकांची आचारसंहिता वेळेवर लागल्यास इच्छुक उमेदवारांना तयारीसाठी अत्यंत कमी कालावधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Latest News