पुण्यात आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करताना प्रवाशांना कडक निर्बंध..
 
                
पुण्यातून परदेशात जाणार्या प्रवाशांना ऑनलाइन ’एअर सुविधा’ पोर्टलवर स्वयंघोषणापत्र अपलोड करावे लागणार आहे. त्यात गेल्या 14 दिवसांच्या प्रवासाची माहिती द्यावी लागणार आहे आणि 72 तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट देखील अपलोड करावा लागणार आहे.
या स्वयंघोषणापत्रातील सर्व माहिती खरी असावी; अन्यथा त्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल. प्रवास करतानाच शासनाच्या नियमाप्रमाणे प्रवाशांना गृह किंवा संस्थात्मक विलगीकरण आणि स्वयंआरोग्य देखरेख याबाबतचे हमीपत्र जोडावे लागणार आहे.पुण्यात आता प्रवाशांना आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करताना कडक निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे. प्रवासाचे निर्बंध लादलेल्या दक्षिण आफ्रिकेसह 12 देशांमध्ये जाण्यासाठी आणि त्या देशातून येण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे
. ही चाचणी जाण्याच्या 72 तास आधी करायची आहे. परदेशातून विमानतळावर उतरल्यावर लगेचच ही चाचणी होईल.यासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांची नियमावली केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नुकतीच जारी करण्यात आली आहे. त्यानुसारच परदेशातून पुणे विमानतळावर आलेल्या प्रवाशांना नियमांचे पालन करावे लागणार आहे.
आफ्रिकेत सापडलेल्या ओमिक्रॉन या व्हेरियंटमुळे देशात आता पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे केंद्रासह राज्यांनीही विमानतळ प्रशासनाला कडक नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे 1 डिसेंबर 2021 पासून प्रवाशांना आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. 5 वर्षांच्या आतील मुलांची या वेळी तपासणी करण्यात येणार नाही.
प्रवासादरम्यान या मुलांना लक्षणे आढळल्यास तपासणी करण्यात येईल.विमानातून उतरताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. त्यानंतर स्थानिक आरोग्य प्रशासनाकडून थर्मल स्क्रीनिंग करण्यात येईल. स्वयंघोषणापत्र स्थानिक आरोग्य विभागाला दाखवावे. जर प्रवाशाला लक्षणे आढळली, तर नियमानुसार त्याला आयसोलेट करण्यात येईल. त्यानंतर पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्या संपर्कातील सर्वांचा शोध घेऊन चाचणी करण्यात येईल.
मंत्रालयाने निश्चित केलेल्या देशांमधून आलेल्या प्रवाशांची विमानतळ प्रशासनाने आरटीपीसीआर चाचणी करावी. या चाचणीचे शुल्क प्रवाशांनाच भरावे लागणार आहे. चाचणी निगेटिव्ह आल्यास गृह विलगीकरण आणि पॉझिटिव्ह आल्यास संस्थात्मक अलगीकरण करावे.

 
                       
                       
                       
                      