डॉक्टर, नर्स, पोलीस यांच्यामध्ये दिसले देव संकटकाळी मदत करणाऱ्यांच्या पाठीशी असतो परमेश्वर


संकटकाळी मदत करणाऱ्यांच्या पाठीशी असतो परमेश्वर
खडकी : आज कोरोनामध्ये अनेक मातब्बर, करोडपती, अरबपतींनी माणसाला बरंच काही शिकवीले आहे. सर्व संपत्ती सोडून जगाचे निरोप घेतले, त्यांच्या अंत्यविधीसाठी घरचे, नातेवाइक देखील घाबरत होते. मात्र त्यावेळेस अशा भयाण परिस्थितीत डॉक्टर, नर्स, अँम्ब्युलन्स चालक, स्मशान भुमीमधील कामगार आणि पोलिस यांच्यामध्येच खरे देव दिसले असल्याचे उद्गार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी काढले.
महाराष्ट्र ख्रिस्ती संघाच्या वतीने ख्रिसमस महोत्सव आयोजित करण्यात आले होते, प्रमुख पाहुणे म्हणून वाडेकर बोलत होते. याप्रसंगी माजी नगरसेविका शैलजा खेडेकर, आनंद छाजेड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस वसुधा निरभवणे, सेंट अँण्ड्र्यूज चर्चचे रेव्ह. राजेंद्र कटारनवरे उपस्थित होते.
कोरोनामुळे संपूर्ण जगावर प्रचंड मोठे संकट आले आहे. सर्वत्र भयाण स्मशान शांतता सर्वांनी अनुभवली असून या काळातून आपण वाचलो आहे. कोरोना काळात बेड मिळत नव्हते, अॅम्ब्युलन्स उपलब्ध होत नव्हते, इंजेक्शन मिळत नव्हते, ऑक्सिजनचा तुटवडा अशी सर्व परिस्थिती अनेकांनी अनुभवली आहे, मात्र आज कोरोना संपला नसून पुन्हा शासनाने अनेक निर्बंध सुरू केले असल्याने सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे वाडेकर म्हणाले.
कोरोना काळामध्ये डॉक्टर, नर्स, पोलीस सोबतच पत्रकारांनी देखील आपले जीव धोक्यात घालून मनोभावे सेवा केली आहे. इतरांना संकटकाळी मदत करणार्यांना परमेश्वर देखील साहाय्य करतो असे उद्गार रेव्ह. कटारनवरे म्हणाले.
कोरोना काळात सर्वांना विशेष बातम्या पुरविणारे दैनिक पुढारीचे पत्रकार अमोल सहारे यांना स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन भव्य नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आरती मेस्त्री, संजय गायकवाड, गणेश कांबळे, अनिल खुडे, उमेश पाटील, संतोष जरड यांचे सत्कार करण्यात आले.
ख्रिसमस महोत्सवानिमित्त मान्यवरांच्या हस्ते केक कापण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन ख्रिस्ती संघाचे अध्यक्ष सुरेश ससाणे यांनी केले. याप्रसंगी उपमहापौर सुनिता वाडेकर, ज्योती परदेशी, विनोद रणपिसे, डॉ. विजय ढोबळे, अॅड रमेश पवळे, अॅड विठ्ठल आरुडे आदी मान्यवर उपस्थित होते.