‘डॉ. पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०२१’ चे शानदार वितरन…. भानू काळे, डॉ. विनिता आपटे,धनंजय शेडबाळे, नितीन सोनवणे, असलम बागवान सन्मानित


‘डॉ. पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०२१’ चे शानदार वितरण
…………………….
भानू काळे, डॉ. विनिता आपटे,धनंजय शेडबाळे, नितीन सोनवणे, असलम बागवान सन्मानित
पुणे :
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आणि ‘प्रबोधन माध्यम’ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या ‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०२१’ चे सोमवारी सकाळी शानदार समारंभात वितरण करण्यात आले .
मराठी साहित्यात मोलाची भर टाकण्यासाठी कार्यरत ‘ अंतर्नाद ‘ चे संपादक भानू काळे, दीड लाखाहून अधिक वृक्ष लागवड करणाऱ्या ‘ तेर पॉलिसी सेंटर ‘ च्या संस्थापक डॉ. विनिता आपटे, सह्याद्री देवराई सामाजिक संस्था चे विश्वस्त ,पर्यावरणप्रेमी धनंजय शेडबाळे, सायकलवरून ४६ देश फिरून गांधी शांती चा संदेश देणारे विश्वयात्री नितीन सोनवणे, मनपा क्षेत्रात क्षेत्रसभा होण्यासाठी पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते ,इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप चे संस्थापक अस्लम इसाक बागवान यांना ‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान’ देऊन सन्मानित करण्यात आले . डॉ.पी ए इनामदार गुणवत्ता, कार्यक्षमता पुरस्कार देऊन डॉ. मुश्ताक मुकादम, बिलाल शेख यांना सन्मानित करण्यात आले .
‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०२१’ चे वितरण सोमवार ,दि . २७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर यांच्या हस्ते आझम कॅम्पस येथील हाय टेक हॉल मध्ये करण्यात आले. खासदार डॉ अमोल कोल्हे हे दूरदृश्य प्रणाली द्वारे सहभागी झाले . संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक बीडकर यांनी प्रास्ताविक केले . संस्थेचे सचिव प्रा.इरफान शेख यांनी आभार मानले . गौरी बीडकर यांनी सूत्रसंचालन केले .
‘महाराष्ट्र कॉस्मापॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित केले जाते . यावर्षी डॉ.पी. ए. इनामदार यांचा ७७ वा वाढदिवस असून, सन्मान सोहळ्याचे तेरावे वर्ष होते. रोख रक्कम,सन्मानचिन्ह,शाल,पुष्पगुच्छ असे या सन्मानाचे स्वरूप होते
‘डॉ पी ए इनामदार यांनी व्रतस्थासारखे कार्य सामाजिक ,शैक्षणिक ,आर्थिक क्षेत्रात केले असून त्यांच्या वाढदिवशी समाजातील प्रेरक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान अनोखा उपक्रम आहे .त्यातून पुढील पिढीस विधायक कार्याची प्रेरणा मिळो ‘,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना केले .
दूरदृश्य प्रणाली द्वारे शुभेच्छा देताना खासदार डॉ अमोल कोल्हे म्हणाले ,’सामाजिक कार्यकर्ते उच्च पदावर पोहोचलेल्यानंतर सन्मान करण्याची जगरित आहे. परंतु समाजकार्य करण्याच्या सुरुवातीच्या काळात कौतुकाची थाप पाठीवर पडणे गरजेचे असते .प्रबोधन माध्यम आणि महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी यांनी ही बाब ओळखून सुरू केलेल्या उपक्रमास माझ्या शुभेच्छा आहेत .उद्याचे जग घडविणाऱ्या मंडळींच्या पाठीशी आज ,आत्ता, ताबडतोब उभे राहणाऱ्या मंडळींची जगाला आवश्यकता आहे .अशा कार्यात मी नेहमीच पाठीशी उभा राहीन’.
सन्मान सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना भानू काळे म्हणाले ,’सामाजिक कृतज्ञता हा विषय आपल्या समाजजीवनात अधोरेखित केला पाहिजे .समाजाने आपल्याला दिलेले परत देणे प्रशंसनीय आहे . धनंजय शेडबाळे म्हणाले ,’पृथ्वी संकटात असून ती वाचविण्यासाठी धोरण निर्मितीपासून प्रत्यक्ष जमिनीवरील कामाला प्राधान्य दिले पाहिजे’ . ‘पर्यावरण संवर्धन हा महत्वाचा विषय असून पर्यावरण पत्रकारितेसाठी वार्षिक पुरस्कार सुरु करण्याची घोषणा डॉ विनिता आपटे यांनी त्यांच्या मनोगतात केली . नितीन सोनावणे म्हणाले ,’तालिबानी म्हणजे कोणी व्यक्ती नसतात तर मनोवृत्ती असते . जगात फिरताना गांधी विचार हा मानवतेसाठी सर्वश्रेष्ठ असल्याची जाणीव झाली’. असलम बागवान म्हणाले ,’लोकशाही बळकट करण्यासाठी रोज लढा दिला पाहिजे .
कार्यक्रमाला विद्यार्थी ,प्राचार्य ,प्राध्यापक ,पदाधिकारी उपस्थित होते .
)
……