राष्ट्रपती लागवट लागू करण्यास त्यांना माझ्या शुभेच्छा – शरद पवार

सातारा::: राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून सर्वच कारभार केंद्राकडे द्या,असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. या विधानाचा शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे. असं विधान करणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असा चिमटा शरद पवार यांनी काढला आहे.राज्यातील विधिमंडळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार स्थिर आहे. या सरकारला क्लिअरकट मेजॉरिटी आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी स्थिर सरकार देण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. म्हणूनच ते अशी विधानं करत आहेत.
साताऱ्यात छत्रपती शिवाजी कॉलेज येथील लोकनेते रामशेठ ठाकूर भवनचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला खासदार श्रीनिवास पाटील, चेअरमन अनिल पाटील, रयत कौन्सिलचे रामशेठ ठाकूर उपस्थित होते
अशी विधाने याआधीही केली गेली होती. त्याचा काही परिणाम झाला नाही. अशा पद्धतीच्या विधानांना नागरिक गांभीर्याने घेत नाहीत, असा टोलाही पवारांनी लगावला.
दरम्यान, या कार्यक्रमात रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेसाठी मदतीचा 2 कोटी 50 लाखाचा धनादेश रयतचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केला. रामशेठ ठाकूर आतापर्यंत अनेक शैक्षणिक संस्थांना मदत केली असल्याचे सांगत शरद पवार यांनी रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी त्यांनी माझं गणितच कच्चं आहे. आकडे माझ्या लक्षात रहात नाहीत. त्यामुळे मी कधीच कॉमर्समध्ये अॅडमिशन घेतलं नाही. मात्र ठाकुरांसोबत बोलायचं असेल तर आकडे लक्षात ठेवावेच लागतात, असं ही शरद पवार यांनी म्हणताच एकच खसखस पिकली.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांवर टीका केली होती. राज्यातील प्रत्येक प्रश्न केंद्र सरकारनेच सोडवायचा असेल तर महाविकास आघाडी सरकारने राजीनामा देऊन राज्यात राष्ट्रपती राजवट स्वीकारावी, असं आव्हान त्यांनी अशोक चव्हाणांना दिलं होतं.