विजयस्तंभा जवळील ५० एकर जागा राज्य सरकारने ताब्यात घ्यावी:रामदास आठवले

पुणे : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाजवळील ५० एकर जागा राज्य सरकारने जमीन मालकांना योग्य मोबदला देऊन ताब्यात घ्यावी आणि या जागेवर पुरातत्त्व खाते व पर्यटन विभागाच्‍यावतीने आंतरराष्ट्रीय स्मारक उभारावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी पुण्यात बोलताना केली.

विजयस्तंभाचे दर्शन दरवर्षी केवळ एक जानेवारीलाच नव्हे, तर कायम दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था करावी. ग्रंथालय, संग्रहालय निर्माण करावे आणि महार बटालियन व पोलिसांनीही दरवर्षी विजयस्तंभाला मानवंदना दिली पाहिजे, असे मतही आठवले यांनी यावेळी व्यक्त केले.

आठवले म्हणाले, ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथे येत्या एक जानेवारीला गर्दी करू नये, अशी विनंती अधिकाऱ्यांनी केली आहे. त्यांच्या या विनंतीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले गट) सकारात्मक प्रतिसाद देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाच्या दर्शनासाठी गर्दी न करण्याचे आवाहन पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले आहे. कोरोना प्रतिबंधासाठीच्या सर्व नियमांचे पालन करून अनुयायांनी दर्शनासाठी जावे.

गो कोरोना गो ही घोषणा जगभर गाजली. आता ओमायक्रॉन आला असला, तरी त्याचा प्रभाव फारसा नाही. त्यामुळे यापुढील काळात माझा नारा ‘गो महाविकास आघाडी गो’ असा असणार आहे. तीन चाकांचे हे सरकार एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न आहेत. शेतकऱ्यांना अजून मदत नाही. दलितांना सुविधा मिळत नसल्याची टीका आठवले यांनी यावेळी राज्य सरकारवर केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती लवकर सुधारावी. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना राज्यात शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग झाला होता. उद्धव ठाकरे चांगले मित्र आहेत. राज्यातील सत्तेत शिवसेनेला पन्नास टक्के वाटा देऊ, असे म्हटले असले, तरी अडीच वर्षे मुख्यमंत्री देण्याबाबत कधीही आश्वासन दिलेले नव्हते.शिवसेनेने सत्ता स्थापनेवेळी घात केला.पाच वर्षे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देऊन भाजप शिवसेना एकत्र येण्याचा विचार करावा, असा माझा प्रस्ताव आहे. शिवसेना-भाजप एकत्र येईल का हे पाहावे लागेल. काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी हा मार्ग अवलंबला पाहिजे. याबाबत भाजपला विनंती करणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

पुणे महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) भाजपसोबत राहील. सध्या पुणे महापालिकेत पक्षाचे पाच नगरसेवक आहेत. मागच्या निवडणुकीच्या वेळी पक्षाला १३ जागा दिल्या होत्या. यावेळी १५-१६ जागा द्याव्यात. आरक्षण पडल्यास महापौरपद पक्षाला द्यावे. मुंबईतही भाजप-रिपाइं एकत्रित येऊन उपमहापौर पद रिपाइंला मिळेल. अन्य महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपसोबतच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

Latest News