पोलिसांनीच रचला पोलीस कर्मचाऱ्याला मारण्याचा कट उघड


पुणे:: एका पोलीस कर्मचाऱ्यानं दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारण्याची सुपारी (Give contract to kill police) दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी पोलिसानं एका सराईत गुन्हेगाराशी हातमिळवणी करून पीडित पोलीस कर्मचाऱ्याला मारण्याचा कट रचला होता. पण दत्तवाडी पोलिसांनी आरोपींचा हा कट उधळून लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुपारी घेणाऱ्या गुन्हेगारासह त्याच्या एका साथीदाराला अटक (2 Accused arrested) केली आहे. तर मुख्य आरोपी पोलीस कर्मचारी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.
योगेश प्रल्हाद अडसूळ असं अटक केलेल्या 35 वर्षीय आरोपीचं नाव असून तो हडपसर परिसरातील एकता कॉलनीत राहतो. तर नितीन दुधाळ असं गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. आरोपी दुधाळ हा पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील बाळसाहेब लोहार यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी गेल्या दोन महिन्यांपासून पीडित पोलीस कर्मचाऱ्यावर पाळत ठेवून होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पोलीस कर्मचारी नितीन दुधाळ हा दत्तवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घराशेजारी राहायला आहे. दरम्यान दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादातून आरोपी पोलीस दुधाळ याने संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येचा कट रचला. त्यासाठी आरोपीनं योगेश अडसूळ नावाच्या सराईत गुन्हेगाराची हडपसर परिसरात भेट घेतली. येथे त्याला सुपारी देऊन पोलिसाला मारहाण,अथवा अपघात घडवून गंभीर दुखापत करून कायमचं अपंगत्व आणण्याची किंवा जीव गेला तरी चालेल, असं सांगितलं. गुन्हेगार अडसूळ हा अलीकडेच एका खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगातून सुटून बाहेर आला आहे.
सौदा पक्का झाल्यानंतर, अडसुळ याने दत्तवाडी येथील एका गुन्हेगाराला या पोलीस कर्मचाऱ्याची सर्व माहिती काढण्यास सांगितलं. तो कुठे जातो, कधी येतो, त्याच्याकडे कोणतं हत्यार आहे का, अशी सर्व माहिती काढण्यास सांगितली. हा गुन्हेगार गेल्या दोन महिन्यांपासून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर पाळत ठेवून होता. दरम्यान, संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येची सुपारी दिल्याची गुप्त माहिती दत्तवाडी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे दत्तवाडी पोलिसांनी पाळत ठेवणाऱ्या गुन्हेगाराला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता, गुन्हेगार अडसूळ याचं नाव समोर आलं. यानंतर पोलिसांनी त्यालाही अटक केली. दोघांची चौकशी केली असता, पोलीस कर्मचारी नितीन दुधाळ यानेच सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी दुधाळ हा सध्या फरार असून दत्तवाडी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.