महापालिका प्रशासनाने विकासकामे करताना काळजी घ्यावी : स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव


महापालिका प्रशासनाने विकासकामे करताना काळजी घ्यावी : स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव
– पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन
पिंपरी । प्रतिनिधी
चिखली परिसरात महापालिकेकडून अनेक विकासकामे केली जात आहेत. ही विकासकामे करत असताना ठेकेदार व संबंधित कामगारांकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने विकासकामे करताना काळजी घ्यावी, अशी मागणी स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, चिखली येथील पूर्णानगर मध्ये देखील विकासकामे सुरु आहेत. रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात काम सुरु आहे. हे काम करत असताना कामगारांकडून व ठेकेदाराकडून आवश्यक काळजी घेतली जात नाही. जेसीबी मशीनद्वारे रस्ते खोदताना निष्काळजीपणा केला जात आहे. विजेच्या वायर तुटणे, पाण्याच्या पाईपलाईन फुटणे अशा घटना वारंवार होत आहेत.
विजेच्या वायर तुटल्यास तो बिघाड दुरुस्त करण्यासाठी अनेक तासांचा कालावधी लागतो. मागील दोन दिवसांखाली पाण्याची पाईपलाईन फुटली. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. शहरात पाणीपुरवठा अजूनही पूर्णपणे सुरळीत झालेला नाही. त्यात असे पाणी वाया गेल्यास नागरिकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागतो. असे प्रकार होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना करून संबंधितांना योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणीही स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी केली आहे.
**