जम्बो कोविड सेंटरच्या कामाशी कोणताही राजकीय संबंध नव्हता- उपमुख्यमंत्री अजित पवार


पुणे: कोरोना काळात पुण्यात जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आलं. मात्र, या कोविड सेंटरचं काम ज्यांना देण्यात आलं ती कंपनी संजय राऊत यांच्या मित्र परिवाराची असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या संदर्भात किरीट सोमय्या यांनी एक निवेदनही पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिलं आहे. मुख्यमंत्री आणि संजय राऊत यांच्या दबावामुळे पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचं कंत्राट लाईफलाईन कंपनीला दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना काळात पुण्यात जम्बो हॉस्पिटल उभं केलं. यात राजकीय पदाधिकाऱ्यांना उभं न करता, विभागीय आयुक्त, पीएमसी आयुक्त, जिल्हाधिकारी, पीएमआरडीए आयुक्त आणि जिल्हा परिषद सीईओ यांनी मिळून काम केलं. अतिशय पारदर्शकपणे काम करण्याचं मी आधीच सांगितलं होतं. पण आता घोटाळा झाल्याच्या बातम्या आल्याने आजच्या बैठकीत हा विषय घेण्यात आला.
या बैठकीत काय-काय घडलं, कशा प्रकारे कोविड केअर जम्बो हॉस्पिटलचं काम झालं याबाबत माहिती दिली. पुण्याच्या कोविड सेंटरची कामे पारदर्शक पद्धतीने झाली, जम्बो कोविड सेंटरच्या कामाशी कोणताही राजकीय संबंध नव्हता असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.
किरीट सोमय्यांनी केलेल्या या आरोपांनंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. सध्या जंबो कोवीड सेंटरची खुप चर्चा सुरु आहे. पुण्यात एक आणि पिंपरी-चिंचवडमधे एक अशी दोन जंबो कोवीड सेंटर उभारण्यात आली होती. या सेंटरच्या व्यवस्थापनात कोणतीही राजकीय व्यक्ती नव्ह्ती तर सगळी जबाबदारी अधिकाऱ्यांवर होती. मात्र या जंबो कोवीड सेंटरबाबत आरोप होत असल्याने पी एम आर डी ए च्या आयुक्तांना याबाबत नोट काढायला सांगितलय.
पुण्यातील जंबो कोवीड सेंटरमधे कोणतीही चुकीची गोष्ट झालेली नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं.किरीट सोमय्यांचा काल पुणे भाजपकडून सत्कार करण्यात आला. यावेळी किरीट सोमय्या यांनी म्हटलं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गुंडांनी गेल्या शनिवारी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. त्या मुख्यमंत्री ठाकरे यांना माझा संदेश आहे, तुम्ही ज्या कोविड कंपनीला कोविड सेंटरचं कंत्राट दिलं त्या कंपनीचा मालक कोण आहे? मी पुणेकरांना त्याचं नाव सांगतो. ती कोविड कंपनी कधी रजिस्टर झाली नाही. त्याचा मालक एक केएम हॉस्पिटलच्या मागे चहावाला आहे. तो त्या कंपनीचा मालक आहे.उद्धव ठाकरे पुण्याच्या लोकांच्या जीवाशी खेळले आहेत. त्यांचे मित्र संजय राऊत यांच्या बेनामी कंपन्या आहेत. 100 कोटींचे कंत्राट दिले. पुणे महापालिकेने त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्या कंपनीला मुंबई महापालिकेतून चार कंत्राट दिले.
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या बेनामी कंपनी आहे. त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय किरीट सोमय्या शांत बसणार नाही”, असंही किरीट सोमय्या म्हणाले.किरीट सोमय्या म्हणाले, संजय राऊतच्या मित्र परिवाराच्या पार्टनरची कंपनी आहे. या कंपनीला कंत्राट दिलंच कसं?, पीएमआरडीएकडे या कंपनीचे काहीही कागदपत्रे नाहीत, अर्जही नाही आणि तरी सुद्धा त्यांना कंत्राट दिलं. उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्या मदतीने कोविडमध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे, कारवाई व्हायलाच हवी.