नागरिकांचा जाहीरनामा तयार करण्यासाठी ‘अपेक्षा जागर मेळावा ‘

पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस महासंघाचा पुढाकार

पुणे :

पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा जाहीरनामा तयार करण्यासाठी पुणेकर नागरिकांचा ‘अपेक्षा जागर मेळावा ‘ आयोजित करण्यात आला आहे.पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस महासंघाने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन , सचिव मनीषा कोष्टी यांनी याबाबत पत्रकाद्वारे माहिती दिली.

मनोहर मंगल कार्यालय (मेहेंदळे गॅरेज) एरंडवणे पुणे येथे दि. २३ फेब्रुवारी (बुधवार) सायंकाळी ५ ते ७ या वेळात हा मेळावा होणार आहे.

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत आणि त्या अनुषंगाने नागरिकांच्या मनात ही आपल्या प्रभागातील उमेदवाराकडून मूलभूत विकास आणि नागरी सोयी संदर्भात निश्चितच काही अपेक्षा आहेत.

त्या अपेक्षा आणि नागरिकांची भूमिका समजावून घेण्यासाठी पुणेकर नागरिकांचा मतदार
अपेक्षा जागर मेळावा आयोजित करण्यात येत आहे. विविध समविचारी संस्था, नागरी समस्या आणि त्यावर उपाय योजना करणारे अभ्यासक, निवृत्त सेवाभावी अभ्यासक यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

नागरिकांनी आपल्या सूचना मार्गदर्शक उपक्रम आणि लोकापयोगी कल्पना लेखी स्वरूपात द्याव्यात. या जनजागृती आणि विचार मंथन उपक्रमातून मिळणाऱ्या सूचना आणि मार्गदर्शक उपक्रमांचा अभ्यास करून नागरिकांचा जाहीरनामा तयार करण्यात येईल.

लायन्स, रोटरी क्लब, व्यापारी, रिक्षा हमाल, पत्रकार, डॉक्टर लेखक, बांधकाम व्यावसायिक, वकिल, वास्तूविशारद, बँका, विमा कंपन्या, हास्य क्लब, महिला मंडळे, जेष्ठ नागरिक संघटना, निवृत्त सरकारी निमसरकारी, सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, पर्यावरण इ. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आयोजित या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

9607505363 या व्हॉटस अप क्रमांकावर आणि Punefed@gmail.com या ईमेलवर देखील नागरिकांना सूचना पाठवता येतील.

संस्थेविषयी ः

पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस महासंघ गेली ४७ वर्षे पुणे जिल्हयातील सहकारी गृहनिर्माण संस्थांना मार्गदर्शन करीत आहे. राजकीय पक्ष, जात, भेद यापासून अलिप्त आहे.

Latest News