विकासकामे उरकण्याच्या नादात त्यांचा दर्जा तर घसरत नाही ना ? माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांचा सवाल


विकासकामे उरकण्याच्या नादात त्यांचा दर्जा तर घसरत नाही ना ?
माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांचा सवाल
पिंपरी, प्रतिनिधी :
महापालिका निवडणुकीची तारीख कधी जाहीर होणार, याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झाले नसले, तरी अपूर्ण राहिलेली विकासकामे पूर्ण करण्याची लगीनघाई प्रभागांमध्ये दिसते. मात्र, कामे उरकण्याच्या नादात त्यांचा दर्जा तर घसरत नाही ना, याकडे महापालिका व स्मार्ट सिटीच्या अधिकार्यांनी गांभिर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहर उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी स्मार्ट सिटी व महापालिकेंतर्गत कामे सुरु आहेत. पिंपळे गुरव – नवी सांगवी परिसरातही कामे अपूर्ण आहेत. रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची कामे रेंगाळली आहेत. एकाच वेळी अनेक अंतर्गत रस्त्यांची खोदाई करून ठेवली आहे. त्यामुळे नागरीकांना आपल्या दुचाकी मुख्य रस्त्यावर पार्क कराव्या लागत आहेत. नागरीकांना ये-जा करण्यासाठीही त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अशी अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून नागरीकांना दिलासा देणे गरजेचे आहे. मात्र, ही कामे उरकण्याच्या नादात कामांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करण्यात येऊ नये. यासाठी अधिकार्यांनी स्वत: लक्ष देऊन ही कामे चांगल्या दर्जाची होण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही राजेंद्र जगताप यांनी सांगितले.
रस्त्याच्या अंतर्गत कामांसोबतच पदपथाची कामे, ड्रेनेजे लाईन, इलेक्ट्रिसिटीची कामे रखडलेली आहेत. ही कामे मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे महापालिका प्रशासनातर्फे आश्वासन देण्यात आले आहे. मुख्य म्हणजे त्यापूर्वीच महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती होण्याची शक्यता गृहीत धरून विद्यमान नगरसेवकांना कामे लवकर पूर्ण करून घेण्याची घाई झाली आहे. कामे उरकण्याच्या नादात कामांची गुणवत्ता घसरून कामे निकृष्ट दर्जाची होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे महापालिका व स्मार्ट सिटीच्या अधिकार्यांनी कामे व्यवस्थित कशी होतील, याकडे लक्ष द्यावे, असेही राजेंद्र जगताप म्हणाले.