बबन झिंझुर्डे यांची पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी निवड घोषित


बबन झिंझुर्डे यांची पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी निवड घोषित
पिंपरी (दि. १ मार्च २०२२) पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी स्वर्गीय शंकर अण्णा गावडे पॅनलचे शशिकांत उर्फ बबन झिंझुर्डे यांची निवड झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम जाधव यांनी मंगळवारी सायंकाळी सात वाजता घोषित केले. या घोषणेनंतर कर्मचा-यांनी महापालिकेच्या बाहेर घोषणा देऊन आनंदोत्सव साजरा केला.
पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य पदासाठी शुक्रवारी (दि. २५ फेब्रुवारी) निवडणूक झाली होती. मतमोजणी झाल्यानंतर आपला महासंघ पॅनेलचे प्रमुख व अध्यक्षपदाचे उमेदवार अंबर चिंचवडे यांनी अध्यक्षपदाच्या मतांवर आक्षेप नोंदविला होता. यानंतर सर्व प्रक्रिया पुर्ण करुन निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम जाधव यांनी
निकाल घोषित करताना सांगितले की, स्वर्गीय शंकर अण्णा गावडे पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार शशिकांत उर्फ बबन झिंझुर्डे यांना एकूण २५३४ मते मिळाली तर त्यांच्याविरुद्ध उभे राहिलेले अंबर चिंचवडे यांना २५२५ मते मिळाली आहेत. सर्व पंचविस जागांवर विजयी झालेल्या उमेदवारांना गुरुवारी ३ मार्च रोजी निवडणूक कार्यालयात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.