पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचीच सत्ता येतेय….

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या वेशीवर एल्गार पुकारला होता. या आंदोलनाला केजरीवाल यांनी पाठिंबा दिला होता. तसेच या शेतकऱ्यांची काळजी घेण्यासाठी सर्वोतोपरी योजना केल्या होत्या. कोरोना काळातच हे आंदोलन सुरू झाल्याने शेतकऱ्यांना आरोग्य सुविधा देण्यापासून ते लंगर लावण्यापर्यंतच्या सुविधा केजरीवाल सरकारने दिल्या होत्या. त्यामुळे पंजाबचे शेतकरी आपच्या पाठी उभे राहिले असल्याचं सांगितलं जात आहे.पंजाब विधानसभा निवडणुकांचे कल हाती आले आहेत. त्यानुसार पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला 91, काँग्रेसला 17, अकाली दलाला 6, भाजपला दोन आणि इतरांना एक जागा मिळताना दिसत आहे.सत्ता येतेय हे आता एकदा स्पष्ट झालं आहे. आपला पंजाबमध्ये 91 जागा मिळताना दिसत आहेत. तर सत्ताधारी काँग्रेसला अवघ्या 17 जागा मिळताना दिसत आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत कलह आम आदमी पार्टीच्या पथ्यावर पडताना दिसत आहे. आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनात स्वत:ची जी प्रतिमा निर्माण केली होती. तीच त्यांनी कायम ठेवली आहे. या प्रतिमेला त्यांनी धक्का लागू दिलेला नाही. शिवाय पक्षातून अनेक नेते सोडून गेल्यानंतरही त्यांनी पक्ष विस्कळीत होऊ दिला नाही. उलट दिल्ली कायम राखताना इतर राज्यातही त्यांनी हातपाय पसरायाल सुरुवात केली. त्यामुळे पंजाबमध्ये आपला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळे आम आदमी पार्टी काँग्रेसला सक्षम पर्याय म्हणून उभा राहताना दिसत आहे.पंजाबच्या विद्यमान विधानसभेत काँग्रेस सत्तेत आहे. एकूण 117 जागा असलेल्या विद्यमान विधानसभेत काँग्रेसचे 77, आपचे 20, भाजप 3 आणि अकाली दलाचे 15 आमदार आहेत. तर बहुमतासाठी 59 जागांची गरज आहे. मात्र, आपला 91 जागा मिळताना दिसत असून बहुमतापेक्षाही हा मोठा आकडा आहे.देशात पाच राज्यांच्या निवडणुका होत असताना अरविंद केजरीवाल यांनी केवळ गोवा आणि पंजाबवरच अधिक फोकस ठेवला होता. त्यातही त्यांनी पंजाबमध्ये अधिक जोर दिला होता. कारण मागच्या विधानसभेत पंजाबमध्ये आपला 20 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे पंजाबमध्ये जोर लावला तर आपला जागांचा आकडा वाढू शकतो असं वाटल्याने केजरीवाल यांनी पंजाबमध्ये सर्वाधिक रॅली केल्या होत्या. तसेच संपूर्ण प्रचार मोहिमेत ते पंजाबच्या मतदारांसमोर दिल्लीचं मॉडल ठेवत होते. दिल्लीत कशा प्रकारे सत्ता राबवली जात आहे, त्याची माहिती दिली जात होती. त्याचं प्रतिबिंबही या निवडणुकीत दिसून आल्याचं सांगितलं जात आहे.पंजाब निवडणुकीच्या प्रचारात शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या तीन मुद्द्यांवर केजरीवाल यांनी अधिक भर दिला होता. या तीन मुद्द्यांमुळेच दिल्लीमध्ये आम्ही यशस्वी ठरल्याचं ते सांगत होते. कोरोना काळात दिल्ली कशी सांभाळली गेली हेही ते वारंवार सांगत होते. त्यामुळेही पंजाबच्या लोकांनी केजरीवाल यांच्या आपला पसंती दिल्याचं सांगितलं जात आहे.आम आदमी पार्टी राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला पर्याय बनताना दिसत आहे. खुद्द आपच्या नेत्यांनीही तशी कबुली दिली आहे. बीबीसी हिंदीला दिलेल्या मुलाखतीत आपचे नेते राघव चढ्ढा यांनी ही कबुली दिली आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला मिळालेल्या बहुमतावरून जनता जागे झाली असल्याचं स्पष्ट होत आहे. आमचा पक्ष हा काँग्रेसचे नॅचरली रिप्लेसमेंट आहे. केवळ एका राज्यात आमची सत्ता येत आहे असं नाहीये, तर आम्ही राष्ट्रीय स्तरावर पर्याय होताना दिसत आहोत, असं चढ्ढा यांनी म्हटलं आहे.