पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची ”भगवंत मान” 16 मार्च ला शपथ घेणार

शहीद भगत सिंग यांचं गाव असलेल्या नवांशहर जिल्ह्यातील खटकर कला येथे भगवंत मान यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. लोकांनी अहंकारी लोकांना पराभूत केलं आहे. त्यांनी सामान्य लोकांना विजयी केलं आहे, असं भगवंत मान यांनी म्हटलं आहे. मान यांनी धुरी मतदारसंघातून 58,206 मतांनी विजय मिळविला आहे. त्यांनी काँग्रेसचे दलवीरसिंग गोल्डी यांचा 58 हजार मतांनी पराभव केलानिवडणुकीत बहुमत मिळविल्यानंतर आता आम आदमी पार्टीने सत्ता स्थापण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आपचे खासदार भगवंत मान हे येत्या 16 मार्च रोजी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्या आधी 13 मार्च रोजी भगवंत मान हे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवालयांच्यासह अमृतसरमध्ये भव्य रोड शो करणार आहेत. पंजाबमध्ये सत्ता मिळाल्यानंतर भगवंत मान यांनी आज दिल्लीत जाऊन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी मान यांनी केजरीवाल यांना शपथविधी सोहळ्याला येण्याचं निमंत्रण दिलं. आपने पंजाबमधील 117 जागांपैकी 92 जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुकीत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी हे दोन्ही मतदारसंघातून पराभूत झाले. तर माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांनाही पराभूत व्हावं लागलं आहे.भगवंत मान यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांची भेट घेतली. यावेळी मान यांनी केजरीवाल आणि सिसोदिया यांचा चरणस्पर्श केला. पंजाबमध्ये आपचे केवळ 20 आमदार होते. मात्र, आपने चांगली कामगिरी केल्याने पंजाबच्या मतदारांनी आपला भरभरून मतदान केलं. आपचे 92 आमदार पंजाबच्या लोकांनी निवडून दिले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला केवळ 18, अकाली दल आघाडीला चार, भाजप आघाडीला दोन आणि इतरांचा एका जागेवर विजय झाला आहे.