मणिपूरमध्ये ”बीरेन सिंग” सलग दुसऱ्यांदा सत्तेची सूत्रे हाती घेणार..


( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ): मणिपूर, गोवा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपने विधानसभा निवडणुकीत बाजी मारली. यूपीमध्ये सुरुवातीपासून योगी आदित्यनाथ यांचे नाव निश्चित मानले जात होते, मात्र इतर राज्यांमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार दावेदारी दिसून येत होती. तर दुसरीकडे उत्तराखंडमध्ये पुष्करसिंग धामी यांचा पराभव झाल्यामुळे मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याच सस्पेंस कायम आहे.
गोव्यात प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्रीपदी फेरनिवड झाल्याचे आता निश्चित मानले जात आहे. मणिपूरमध्ये मुख्यमंत्री पदासाठी सुरु असलेला गोंधळ अखेर संपुष्टात आला असून, एन. बिरेन सिंग हेच राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील, असे भाजपातर्फे सांगण्यात आले आहे. मणिपूर भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली असून, बीरेन सिंग सलग दुसऱ्यांदा राज्यातील सत्तेची सूत्रे हाती घेणार आहेत.
भाजपच्या केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामन आणि किरेन रिजिजू यांच्या उपस्थितीत रविवारी झालेल्या बैठकीत बिरेन सिंग यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. मात्र, शपथविधी सोहळ्याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मणिपूरमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर दहा दिवसांनी हा निर्णय घेण्यात आला आहे.
बिस्वजित सिंह आणि वाय खेमचंद हे देखील राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी दावेदार असल्याचे सांगण्यात येत होते. निर्मला सीतारामन म्हणाल्या की, विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत एन. बिरेन सिंग यांची एकमताने नेतेपदी निवड करण्यात आली असून, हा एक चांगला निर्णय आहे. बिरेन सिंग मणिपूरमध्ये स्थिर आणि जबाबदार सरकार सुनिश्चित करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त करत मोदी सरकार ईशान्येकडील राज्यांवर विशेष लक्ष देत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.