रघुनाथ कुचिक यांच्या मुलीची भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांची महिला आयोगाकडे गंभीर तक्रार…

मुंबई ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) – शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका २४ वर्षीय तरुणीवर बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाला आता धक्कादायक वळण लागलं आहे. कारण, रघुनाथ कुचिक यांच्या मुलीने भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांची महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुचिक यांनी पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले होते. त्यानंतर त्यांनी तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यांनी तरुणीला पुण्यात मॉडेल कॉलनीतील एका फाउंडेशनच्या कार्यालयात आणि पुणे आणि गोव्यातील नामांकित हॉटेलमध्ये नेले होते. त्यानंतर ती तरुणी गर्भवती राहिली. ही बाब कळताच त्यांनी जबरदस्तीने तरुणीचा गर्भपात केला. त्यांनी तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली, असे तरुणीच्या तक्रारीत नमूद आहे.
चित्रा वाघ या पोलिसांसमोर खोटं बोलत असल्याची टीकाही आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे. चित्रा वाघ आणि पीडित मुलगी संगनमताने बदनामी करत आहे, अशी तक्रार कुचिक यांच्या मुलीने केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन रुपाली चाकणकर यांनी पुणे पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता चित्रा वाघ यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.