या सगळ्या प्रकरणाच्या सत्यतेसाठी मी तयार आहे- चित्रा वाघ

पुणे : 

रघुनाथ कुचिक प्रकरणातील पिडीतेने वाघ यांच्याकडे मदत मागितली होती, त्यानंतर वाघ यांनी संबंधित तरुणीस कायदेशीर मदत मिळवून देण्यास, पोलिसांशी संपर्क साधण्यामध्ये मदत केली होती. त्याचबरोबर कुचिक यांच्याविरुद्ध पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर कडक आरोप केले होते.

दरम्यान, मंगळवारी सकाळी पिडीत तरुणीने अचानक चित्रा वाघ व त्यांच्या साथीदारांनीच आपल्याला कुचिक यांच्याविरुद्ध जबदस्ती गुन्हा दाखल करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला. या घटनेनंतर वाघ यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भुमिका मांडली.वाघ म्हणाल्या, “”पिडीत तरुणीचा मला 16 फेब्रुवारीला फोन आला होता.मी तिला भेटल्यानंतर तिने तिच्याकडील सर्व पुरावे मला दाखविले, असे असूनही तिची पोलिस व अन्य कोणीही दखल घेत नसल्याचे तिने सांगितले. तिच्याकडून माहिती मिळाल्यानंतर, ती एकटी लढत असल्याने तिला न्याय देण्यासाठी मी तिच्यासमवेत उभी राहीले. तिला मदत करणे हा गुन्हा आहे का ? मीच पोलिसांना फोन करुन तिला मदत करण्यास सांगितले.

आता पिडीत तरुणी माझ्याविरोधात बोलली, त्यानंतर लगेचच सगळ्या महिला माझ्याविरुद्ध बोलायला लागल्या. ती एकटी लढत होती, त्यावेळी तुम्ही कुठे गेला होता. पिडीतेच्या आरोपामुळे माझा आवाज आता बंद होईल, हा सरकारचा गैरसमज आहे.

पिडीत तरुणी एकटी लढत होती, तिला न्याय मिळावा म्हणुन आम्ही पुढे आलो, तेव्हा कोणी पुढे आले नाही. पिडीत तरुणीने माझ्याविरुद्ध बोलल्यामुळे माझा आवाज बंद होईल, असे सरकारला वाटत असेल, तर हा तुमचा गैरसमज आहे. या सगळ्या प्रकरणाच्या सत्यतेसाठी मी तयार आहे.” अशा शब्दात भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आपल्या भुमिकेचे समर्थन केले””मला अशा प्रकरणामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पिडीत मुलगी आज जे बोलत आहे, ते पुन्हा एकदा तपासा. पिडीतेला मदत करण्यामध्ये माझा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नव्हता. माझ्यासाठीही हा अनुभव नवीन आहे. मी या सगळ्या प्रकरणाच्या सत्यता तपासण्यासाठी तयार आहे. कालही साडे सहा वाजेपर्यंत तिचे मला मेसेज येत होते. मला त्या पिडीतेला मदत करायची होती, ती मदत मी केली. माझ्याजागी अन्य कोणाही असते तरी हेच केले असते.” असे सांगत वाघ यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले.

Latest News