नवनायिका’ नृत्यनाटिकेतून आजच्या स्त्री-जीवनाचे प्रभावी सादरीकरण —– भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम

‘नवनायिका’ नृत्यनाटिकेतून आजच्या स्त्री-जीवनाचे प्रभावी सादरीकरण ——————————– भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम

पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर करण्यात आलेल्या शास्त्रीय नृत्यावर आधारित ‘नवनायिका’ या नृत्यनाटिकेला शनिवारी सायंकाळी भरभरून प्रतिसाद मिळाला. कलाश्री नृत्यालय,पुणे निर्मित ही नृत्यनाटिका शनिवार,१६ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे सादर झाली.या नृत्यनाटिकेची संकल्पना व नृत्यदिग्दर्शन गुरु श्रीमती प्रमद्वरा कित्तूर यांची होती. संगीत अजित अवधानी यांनी दिले होते . कलाश्री नृत्यालयाच्या २० कलाकारांनी या नृत्यनाटिकेत सहभाग घेतला . या नृत्यनाटिकेतून आजच्या स्त्री-जीवनाचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले . मल्लारी या पारंपारिक रचनेपासून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कलाश्री नृत्यालयाच्या विद्यार्थीनींनी ही रचना सादर केली. यानंतर आदी शंकराचार्य यांची पारंपारिक रचना गणेश पंचरत्न-‘गणेश मुदकरत मोदकम् ‘ही नृत्य रचनेतुन सादर करण्यात आली. भरतमुनींच्या नाटयशास्त्र या ग्रंथात श्लोकातून आठ नायिकांचे वर्णन केले आहे. त्या अष्टनायिका कलाश्री नृत्यालयाच्या विद्यार्थिनींनी नृत्यातून सादर केल्या.महिलांच्या आठ प्रकारच्या आनंद,दुःख,मत्सर,राग,लोभ,द्वेष भावनांच्या छटा प्रभावीपणे साकारण्यात आल्या.नवनायिका मधून महिलाशक्तीची प्रेरणा नृत्याद्वारे मांडण्यात आली.आजच्या जगातल्या पिढीच्या धडपडणाऱ्या युवती,महिलांची कथाच जणू नृत्यातून पुढे आली .’ नवनायिका’ स्त्रीची विविध रूपे नृत्य नाटिकेतून मांडण्यात आली. नोकरी , व्यवसाय करून घर सांभाळणारी, मुलगा आणि मुलींना समान वागणूक देणारी, माणुसकीचं नाते जपणारी, अनाथ मुलीला वाचवून तिला मातेचे प्रेम देणारी, स्वतंत्र विचारांची स्त्री, समलिंगी प्रेम करणारी स्त्री, एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ एकटेपण दूर करणारी लिव्ह इन मध्ये राहणारी , हलाखीची परिस्थिती असून आपल्या मुलीला उच्च शिक्षण देण्यासाठी स्वप्न पाहून पूर्ण करणारी, लैंगिक शोषणाविरूद्ध सामना करण्यासाठी स्वतःला सक्षम बनवणारी स्त्री -अशा या नवनायिकांचे दर्शन नृत्य नाटिकेतून उपस्थितांना घडले. आकांक्षा शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. सर्व कलाकारांचा ज्ञानेश्वरीची प्रत आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Latest News