शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या नृत्य महोत्सवाचा २८ एप्रिल रोजी समारोप

‘ पुणे डान्स सीझन -२o२२ ‘
पुणे :जागतिक नृत्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या वतीने आयोजित ‘ पुणे डान्स सीझन -२o२२ ‘ या नृत्य महोत्सवाचा समारोप २८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता भारतीय विद्या भवन(सेनापती बापट रस्ता) येथे होणार आहे.नृत्य प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत २७ संस्था समारोप कार्यक्रमात सहभागी होणार आहेत,४ विविध शैलीत शास्त्रीय नृत्य सादर करणार आहेत.

ज्येष्ठ नृत्य गुरु सुचेता भिडे-चापेकर,मनीषा साठे,शमा भाटे,भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.संस्थेच्या वतीने रसिका गुमास्ते,अरूंधती पटवर्धन यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.प्रवेश विनामूल्य आहे.

२३ एप्रिल पासून आठवडाभर या नृत्य महोत्सवाचे कार्यक्रम घेण्यात आले.कोरोना साथीच्या दोन वर्षांच्या खंडानंतर हा नृत्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता.त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला.

शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेविषयी

२०१८ साली पुण्यातील आदरणीय नृत्य गुरु शमा भाटे, गुरू सुचेता चापेकर आणि गुरू मनीषा साठे यांच्या विचारातून शास्त्रीय नृत्य व त्याची साधना करणारे कलाकार यांच्यासाठी, शास्त्रीय नृत्य कलाकारांनी चालवलेली शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था उदयास आली. आजवरच्या संस्थेच्या कारकिर्दीत ८०० पेक्षा जास्त नृत्यकलाकार असलेला नृत्योत्सव, नृत्य दिनाचे औचित्य साधून साकारलेला डान्स सीझन च्या अंतर्गत विविध स्पर्धा, प्रदर्शने आणि सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याकरता पुण्यातील विविध बागांमध्ये केलेले नृत्य प्रदर्शन याचा समावेश आहे. या व्यतिरीक्त ‘ लक्ष्य ‘ हा एकल सादरीकरणांचा कार्यक्रम आणि ‘नृत्यबंध ‘हा सांघिक नृत्य कलाकारांचा कार्यक्रम ॐकारेश्वर देवस्थानाच्या सहकार्याने केला जातो.
संस्थेचे उद्दिष्ट एकत्रितपणे काम करून शास्त्रीय नृत्याचे संवर्धन करणे तसेच गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि पुण्यात एक सर्व व्यवस्थासंपन्न संकुल उभारणें हे आहे.

Latest News