आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर.. अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी..

अगदी सुरवाती पासून राजकारणाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर, निवडणुकापूर्वी जनता दलाशी राजकीय समझोता करून,व्ही.पी सिंह पंतप्रधान झाल्यावर त्यांची मंत्रिपदाची ऑफर न स्वीकारता,आंबेडकरी समाजहिताच्या महत्वपूर्ण बाबी त्यांनी व्ही.पी.सिंह कडून करून घेतल्या,१९५६ पासून अपूर्ण राहिलेली बाब “बौद्धांचा समावेश अनुसूचित जातीत करावा”,या साठी भैय्यासाहेब आंबेडकर त्याकाळचे पंतप्रधान मोरारजी देसाई ना भेटायला गेले,त्यावेळी मोरारजी, भैय्यासाहेबाना म्हणाले,कोणी सांगितले महारांना बौद्ध व्ह्यायला?? त्यावर “आमच्या बापाने” हे उत्तर देऊन भैय्यासाहेब तिथून निघाले,हीच मनातील सल ठेवून प्रकाश आंबेडकर व्ही.पी सिंह ना मंडल आयोगानुसार बौद्धांचा समावेश अनुसूचित जातीत करायला भाग पाडतात,तसेच संसदेमध्ये बाबासाहेबांचे तैलचित्र,भारतरत्न किताब हे ही बाळासाहेबांच्या मुत्सद्देगिरीचे यश आहे..पण भाजपने मंडल विरुद्ध खेळी करून सरकारचा पाठिंबा काढला,त्यानंतर राजीव गांधींचे सरकार असताना बाळासाहेबांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याची ऑफर आली,पण “आंबेडकरी चळवळ दाबली जाईल” या भीतीने त्यांनी दोन वेळा मंत्रीपदावर लाथ मारली.

मराठी बरोबर इंग्रजी भाषेवर त्यांची पकड किती मजबूत आहे हे,दूरदर्शन,संसद आणि इतर विद्यापीठांमधून दिलेल्या व्याख्यानावरून आपल्याला हे लक्षात येईल. ३० ऑगस्ट २००१ मध्ये *दक्षिणाफ्रिका,डरबन मध्ये सयूंक्त राष्ट्राचे अधीवेशन भरविण्यात आले होते,त्या अधिवेशनात बाळासाहेब म्हणाले की,आफ्रिकेमध्ये काळा-गोरा हा वंशवाद आहे त्याहीपेक्षा भारतात होणारा जातीवाद हा खूप मोठा आहे आणि यालासुद्धा सयूंक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे,पण त्यावेळचे अध्यक्ष “कोफी अन्नान” यांनी नकार दिला,तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतात होणाऱ्या जातीयवादाची नोंद घेतली गेली हे बाळासाहेबांचेच श्रेय आहे.

बाळासाहेबांचा मंडल आयोगापासून सुरू झालेला लढा,ओबीसी साठी थेट सर्वोच्चन्यायल्यात गेला,स्वतःला ओबोसी नेते म्हणवून घेणारे छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे पक्षश्रेष्टींच्या भीतीमुळे केस करायला घाबरले,पण बाळासाहेबांनी तिथेही अंगावर कोट घालून ओबीसीना न्याय मिळवून दिला. RSS कधीच स्वतंत्र दिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा करीत नाही म्हणून कार्यकर्त्यांसह त्यांच्या मुख्यालयात जाऊन तिरंगा झेंडा फडकविणारे बाळासाहेब आंबेडकर होते,त्याचे स्पष्टीकरण प्रमोद महाजन याना द्यावे लागले होते.
२००० च्या काळात भारिप ने स्वबळावर सत्ता मिळवली आहे. काहींना त्यात मंत्रिपद दिलं. कोळी समाजाचे दशरथ भांडे,रामदास बोडखे आहेत,कासार समाजाच्या स्त्रीला महाराष्ट्राच्या इतिहासात जिल्हापरिषदेचे अध्यक्ष बाळासाहेबांनी बनविले. बाळासाहेबांनी कितीतरी जणांना मोठं बनवलं,त्यात निलम ताई गोर्हे ,चंद्रकांत हंडोरे,रामदास बोडखे,भांडे,सूर्यवंशी,मखराम पवार आहेत पण “व्यक्तीपेक्षा चळवळ महत्वाची आहे” याला बाळासाहेबांनी नेहमी अग्रस्थान दिले.
एन्रॉन किंवा वेगळा विदर्भ,कापसाचा प्रश्न,शेतकरी आत्महत्या बाबतीत पंतप्रधान आणि सोनिया गांधीनाही कोर्टात खेचणारे एकमेव नेते बाळासाहेबच. डाउ कंपनीचा लढा, लवासा प्रश्न,मु स्लिमांसाठी सच्चर आयोग असा बाळासाहेबांनी लढा सुरूच ठेवला.

मागासवर्गीयांवरील अत्याचार थांबविण्यासाठी पँथर ची स्थापना झाली, शिवसेना म्हणजे त्यावेळची “वसंत सेना” मराठी विरुद्ध कानडी दंगल घडवून आणली. त्या दंगलीत ५९ लोकांचा मृत्यू झाला २७४ जखमी झाले. माकपा चे आमदार कृष्ण देसाई यांची हत्या झाली. १९७४ ला दलित पँथर नेता “भागवत जाधव” यांचा खून झाला, “riddles of hindusam”या बाबासाहेबांच्या पुस्तकाला सेनेने विरोध केला. ४ महिने वातावरण सेना विरुद्ध आंबेडकरी जनता असे होते,१९८८ साली काढलेल्या सेनेच्या मोर्चात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर शिवीगाळ केली गेली. सकपाळ ते आंबेडकर कसे झाले याबाबत चिथावणीखोर भाषा वापरून माता भिमाई वर लांच्छन लावले याचाच राग म्हणून ५ फेब्रुवारी १९८८ ला प्रकाश आंबेडकरांनी मंत्रालयावर मोर्चा काढला. हुतात्मा स्मारकाजवळ तणावाचे वातावरण झाले,दुसऱ्याच दिवशी छगन भुजबळ यांनी आपल्या “आका” च्या सांगण्यावरुन धार्मिक विधी करून गोमूत्राने स्मारक धुवून घेतला,नामांतराच्या लढ्यात ही बाळ ठाकरेनी “बाबासाहेब निजामाचे हस्तक,ज्याच्या घरात नाही पीठ त्यांना कशाला हवं विद्यापीठ?, महारांनी आमच्या नोकऱ्या पळवल्या,अशी विधाने केली. नांदेड विद्यापीठाला स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ असे नामकरण केले पण मराठवाडा विद्यापीठासमोर बाबासाहेबांचे नाव लावून फक्त नामविस्तार केला. नामांतराच्या लढ्यात पोचिराम कांबळे,गौतम वाघमारे याना हुतात्म आले,पण बाळ ठाकरेंनी गौतम वाघमारे ना बेवडा म्हणून संबोधले.आणि मरणापूर्वी मी कधी नामांतराला विरोध केला नाही अशी भूमिका ठाकरेंनी घेतली. ठाकरेंच्या निधनानंतर बरेच आंबेडकरी नेते अंत्ययात्रेत दिसले,राज ठाकरे पायी चालत असताना काही आंबेडकरी नेते थेट ट्रकवर चढून जणू आपणच त्यांचे वारसदार असे भासवत होते. सगळे नेते उपस्थित होते फक्त एकच नेता नव्हता ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर…!! आता तुम्ही म्हणाल की दुःखात तरी राजकारण वगैरे विसरून सामील व्हायला हवं होतं, पण आंबेडकरी जनतेवर जुलूम करणाऱ्या,हत्या करणाऱ्या आणि त्यांची चाटत बसलेल्या नेत्यांना खोटा अभिमान असेल पण,स्वतःच्या बापाचा अपमान कोणताच मुलगा विसरू शकत नाही,आणि हाच स्वाभिमान आहे..

ब्राह्मण मुलीशी लग्न केलं,म्हणून काही जण त्यांच्यावर टीका करतात,त्यांच्या पत्नी “अंजलीताई मायदेव-आंबेडकर” यांनी बौद्ध विवाह पद्धतीने विवाह करून बौद्ध धम्माची दिक्षा ग्रहण केली आहे,त्याही आंबेडकरवादी आहेत. त्या कर्वे इन्स्टिट्यूट च्या समाजसेवा विभागाच्या मुख्य सदस्य आहेत,आदिवासी,मागासवर्गीय सरकारच्या मुख्य समित्यांवर त्या सल्लागार म्हणून काम पाहतात, सिएसपी प्लॅन च्या दिल्ली,मुंबई,पुणे च्या ही त्या सल्लागार आहे. तसेच युनिसेफ आणि टाटा सोशल च्या सदस्य आहेत,ग्रामीण भागातील दलित महिला सबलीकरणासाठी “चैतन्य” या NGO च्या समिती सदस्य तर “सम्यक समाज प्रतिष्ठान” च्या त्या विश्वस्त आहेत,बाबासाहेबानंतर भैय्यासाहेब,मीराताई आंबेडकर यांनी समाजासाठी स्वतःला वाहून घेतले. महापरिनिर्वाणानंतर बौद्धांची संख्या ०.७ वरून ५ ते ६ टक्क्यांवर आली,ब्राह्मण समाजात जन्म घेणे आणि कर्माने कर्तृत्वाने बौद्ध असणे यात फरक आहे.
आज जन्माने वारसा हक्काने म्हणजे आईवडील बौद्ध म्हणून त्यांची मुले बौद्ध असणारी पिढीही राजकारणात आहे पण ते आज आरएसएसच्या मांडीवर जाऊन बसलेत.त्यामुळे आपण भावनिक न होता चळवळीशी प्रामाणिक बांधिलकी असणारी बौद्ध बहुजन मागासवर्गीय समाजाशी बांधिलकी आणि त्यांच्या प्रश्नांवर काम करणारी व्यक्ती ओळखली पाहिजे.

आज RSS ला बाळासाहेब खुले आव्हान देत आहेत,दसऱ्याच्या शस्त्र पूजेला बाळासाहेबांनीच विरोध केला,रोहित वेमुलाच्या हत्येनंतर दिल्ली,हैद्राबाद,मुंबईभर प्रकरण पसरवण्यासाठी जनतेसोबत रस्त्यावर उतरले. देशातील असहिष्णुता,अन्याय,देशाची सुरक्षा,शेतकरी आत्महत्या,कामगारांचे प्रश्न,अशा अनेक प्रश्नावर बाळासाहेबांचा लढा सुरु आहे. आज आंबेडकरी समाज व इतर वंचित घटक त्यांच्या सोबत उभं राहून त्यांचे हात बळकट करून तिसरा पर्याय म्हणून मैदानात सज्ज झाले आहेत,चळवळी संबंधी आपली प्रामाणिकता दाखवित आहेत, कदाचित यावेळचे राजकीय गणित वेगळे असण्याची शक्यता नाकारता येत नाही,एक शुभेच्छुक म्हणून बाळासाहेबांच्या कार्याला सलाम आणि त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा.

Latest News