OBC आरक्षण गेलं हे या सरकारचं पाप आहे – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

.मुंबई : ओबीसी आरक्षणासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पुन्हा एकदा एल्गार पुकारला. महाविकास आघाडी सरकारमुळेच ओबीसी आरक्षण गेल्याची टीका करत त्यांनी कार्यकर्त्यांना आता थेट उत्तर देण्याचे आवाहन केलं आहे. भाजपचा ‘डीएनए’चं ओबीसी आहे. ओबीसी हा भाजपचा श्वास आहे, असं म्हणत त्यांनी भाजपमुळेच आरक्षण गेलं अशी टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलंमहाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांना अनेकदा उपाय सुचवले. पण अंमलबजावणी झाली नाही. आयोगाला पैसे दिले नाहीत. आरक्षण गेलं हे या सरकारचं पाप आहे. मध्य प्रदेशने जे केले ते महाराष्ट्राला एक वर्ष आधी करता आले असते. आरक्षणाचे हे हत्यारे आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली.
आरक्षण रद्द होणं हे कोणाचं तरी डिझाईन आहे. कुठलं तरी षडयंत्र, सापळा दिसतोय. निवडणुकांसाठी आऱक्षणाची सोडत 30 तारखेला निघाल्यानंतर पुन्हा पाच वर्षांनीच आरक्षण मिळेल. किंवा सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी नव्याने परवानगी दिली तरच हे शक्य आहे. या षडयंत्रकाऱ्यांनी जाणीवपूर्वक आरक्षण घालवलं आहे. म्हणून आपण हा लढा सुरूच ठेवला पाहिजे. भाजपच्या प्रत्येक आघाडीत ओबीसी आहेत. आपण सर्व राष्ट्रवादी आहोत. सर्वांनी एकत्रित यायला पाहिजे, असं आवाहन फडणवीसांनी केलं.
आमचे नौटंकीबाज मित्र नाना पटोले म्हणतात, ‘फडणवीसांच्या काळातच आरक्षण गेलं.’ अरे फडणवीसांच्या काळात 50 टक्क्यांच्या वरचंही आरक्षण आम्ही शाबूत ठेवलं होतं. तुमचं सरकार आल्यानंतर 15 महिन्यांनी आरक्षणाला स्थगिती मिळाली. ह्यांनी पंधरा महिने झोपा काढल्या. या पोपटांना थेट उत्तर दिलं पाहिजे. भाजपचा डीएनएचं ओबीसी आहे. ओबीसी हा भाजपचा श्वास आहे. भाजपचं शरीर समस्त समाज आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं