दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून तरुणास पुण्यातून अटक


पुणे :: जुनेद गेल्या काही महिन्यांपासून समाजमाध्यमातून जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या संपर्कात आला होता. याबाबतची माहिती मिळाल्यावर एटीएसच्या पथकाने दापोडीतून त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करण्यात आली. तो दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.लष्कर ए तोएबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दापोडी परिसरातून एका तरुणाला अटक केली.
मोहम्मद जुनेद खान (वय २४, रा. दापोडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून दहशतवादी कारवाई करणयासाठी त्याला जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांनी पैसे पुरविल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
जुनेद कोण?
जुनेद मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवाशी असून गेल्या दीड वर्षांपासून पुण्यात राहत होता. या पूर्वी देशभरात झालेल्या दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याच्या संशयावरुन पुण्यातील काहीजणांना अटक करण्यात आली होती.
पुण्यातील तरुणांचे दहशतवादी संघटनांशी संबंध
बंदी घातलेल्या इंडियन मुजाहिदीन संघटनेकडून देशभरात बाँबस्फोट घडविण्यात आले होते. बाँबस्फोटाचा कट तसेच इंडियन मुजाहिदीनच्या कारवायांचा प्रचार करण्यासाठी पुण्यातील कोंढवा भागात एक केंद्र चालविण्यात येत होते. या केंद्रावर मुंबई पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील अतिरिक्त पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी छापा टाकला होता. तेव्हा दहशतवादी कारवायांमध्ये पुण्यातील काहीजण गुंतल्याचे उघड झाले होते.मध्यंतरी राष्ट्रीय तपास संस्थेने पुण्यातील एका तरुणीला अटक केली होती. हे तरुणी गेल्या काही वर्षांपासून दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याचे तपासात उघडकीस आले होते. जर्मन बेकरी, जंगली महाराज रस्ता तसेच फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात दहशतवादी संघटनांनी बाँबस्फोट घडवून आणले होते. देशभरात झालेल्या बाँबस्फोट प्रकरणात पुण्यातील मोहसीन चौधरीचा हात असल्याचे उघडकीस आले होते. कोंढव्यात राहणाऱ्या मोहसीन चौधरी याचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही.