बाळ गोपालांचे नटराजाला साकडे ! बाल व्यक्तिमत्व विकास शिबिराची विविध उपक्रमांनी सांगता


बाळ गोपालांचे नटराजाला साकडे ! बाल व्यक्तिमत्व विकास शिबिराची विविध उपक्रमांनी सांगता
तळेगाव दाभाडे, दि. 28 : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेच्या वतीने आयोजित बाल व्यक्तिमत्व विकास शिबिराची सांगता विविध उपक्रमांनी झाली. नाना भालेराव कॉलनीतील सुंदर हिरवळीवर झालेल्या कार्यक्रमात बालचमुंनी ‘कला शक्ती दे, कला भक्ती दे, कलासक्ती दे नटराजा’, अशी प्रार्थना करत विविध कलाविष्कार सादर केले.
बालकांनी या शिबिरामध्ये मातीकाम, रंगकाम, नाट्य, संगीत, नृत्य, पपेट, टीम स्पिरीट, प्रॉब्लेम सॉलव्हिंग, डिसिजन मेकिंग, प्रसंग नाट्य, मुकाभिनय, योगासने अशा अनेक कला आत्मसात केल्या. तसेच हेरिटेज म्युझिक अकॅडमी व फ्रेंड्स ऑफ नेचर अशा ठिकाणी मुलांची सहलही काढण्यात आली. अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके यांच्यासह मीरा भरड, सायली नायर, सुपर्णा गायकवाड, पूजा डोळस, विनया केसकर, वृषाली आपटे, मारुती पवार आदी प्रशिक्षकांनी मुलांना मार्गदर्शन केले.
यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे, आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष कैलास काळे, नाट्यपरिषदेचे विश्वस्त विश्वास देशपांडे, भरतकुमार छाजेड आदी उपस्थित होते. याप्रसंगी विचार व्यक्त करताना पालकांनी सांगितले, की गेली दोन-अडीच वर्षे घरामध्ये बसलेल्या मुलांना या निमित्ताने नवीन संजीवनी मिळाली, तसेच घरी किंवा शाळेतही ज्या गोष्टी शिकता आल्या नसत्या, त्या शिकायला मिळाल्या. शिबिराचा कालावधी आणखी थोडा जास्त असावा, त्याचबरोबर अशा पद्धतीचे शिबिर हे दर सुट्टीत व्हावे, अशा भावनाही व्यक्त केल्या.
सुरेश धोत्रे यांनी मुलांचे अभिनंदन करत, याच मुलांमधून उद्या उत्तमोत्तम कलाकार घडावेत व मावळ तालुक्याचे नाव पुढे न्यावे, असे आवाहन केले. विश्वास देशपांडे यांनी हे शिबिर फक्त सुट्ट्यांपुरते मर्यादित न ठेवता बालभवनच्या माध्यमातून संपूर्ण वर्षभर मुलांसाठी विविध उपक्रम राबवता यावेत, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. या शिबिराचे नियोजन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यकारिणी सदस्या नयना डोळस व क्षीप्रसाधन भरड यांनी केले. तर सोहम पवार व श्रेया अलबाळ या युवा कलाकारांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. गणेश काकडे यांचे या शिबिराला विशेष सहकार्य लाभले. हॉटेल ड्रीमलँडचे संग्राम जगताप यांच्यातर्फे मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.