आमदार महेशदादांनी धनगर समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे – माजी मंत्री प्रा.राम शिंदे


आमदार महेशदादांनी धनगर समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे – माजी मंत्री प्रा.राम शिंदे
पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड महापालिकेने अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी याठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आहे. परंतु केवळ जागा उपलब्ध करून देऊन चालणार नाही. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातून आमची अनेक बांधव पोट भरायला आलेली आहेत
. ते एक-दोन कोटी खर्च करू शकत नाहीत. आपल्यावर वर्गणी गोळा करायची वेळ येऊ नये, यासाठी आमदार महेशदादांनी धनगर समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठान रूपीनगर राजमाता अहिल्यादेवी होळकर जन्मउत्सव, शोभा यात्रानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी ते बोलत होते. यावेळी रूपीनगर तळवडे परिसरात शोभायात्रा काढ्ण्यात आली. उंट-घोडे, गज नृत्य, डीजे सिस्टीम, ढोल पथक, हलगी वादन या यात्रेचे खास आकर्षण होते
.यावेळी माजी मंत्री प्रा.राम शिंदे, बाळासाहेब दोलतोडे, एकता हिंदू चे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, ऑल इंडिया धनगर समाज चे अध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या शुभहस्ते भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे यांना स्व बी. के. कोकरे सन्मान 2022 हा विशेष सन्मान पत्र देऊन पुरस्कृत करण्यात आले.
तसेच डॉ. राम तांबे (वैद्यकीय क्षेत्र) अॅड. राजेश पुणेकर (कायदेतज्ञ क्षेत्र) शांताराम दगडू भालेकर (सामाजिक क्षेत्र) सुबोध गलांडे (शैक्षणिक क्षेत्र) सागर चव्हाण (गौरक्षण क्षेत्र), निसर्गराजा मित्र जीवांचे (पर्यावरण क्षेत्र) यांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रा. राम शिंदे यांनी सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे समाजकार्य-कर्तृत्व असामान्य राहिलेले आहे
. यापुढील काळात देखील प्रतिष्ठानच्या वतीने लोकोपयोगी कामे केली पाहिजेत, लोकांच्या अडचणीत, दुःखात त्यांना मदत करण्याची भूमिका ठेवली पाहिजे. अहिल्यादेवींच्या विचारांचे अनुकरण करत आपण या प्रतिष्ठानच्या माध्यमातून असेच काम वाढवली पाहिजे. अशी अपेक्षा प्रा. राम शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
मिलिंद एकबोटे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, अहिल्यादेवींनी संपूर्ण हिंदुस्थानात अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला, नद्यांवर घाट बांधले, धर्मशाळा बांधल्या, आणि संपूर्ण भारतीय संस्कृतीला उजाळा दिला. यावेळी त्यांनी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या वर टीका केली. त्यादिवशी एक विद्वान गृहस्थ चौंडीला म्हणाले, अहिल्यादेवींनी रस्ते, पाणी यासारख्या सुविधा निर्माण करत रोजगार वाढवण्याचे काम केले आणि माझा नातू आता तेच काम करतोय. अहो सद्गृहस्थहो, तुम्हाला अहिल्यादेवी ह्या काय कळल्या? अहिल्यादेवी म्हणजे हिंदू धर्म आणि अहिल्यादेवी म्हणजे हिंदू राष्ट्र. तुमच्या शुद्रतेची आम्हाला कीव येते. अशा शब्दात त्यांनी शरद पवार यांच्यावर टिकेची झोड उठवली
. प्रवीण काकडे म्हणाले, आजही अहिल्यादेवींचा इतिहास तळा-गाळामध्ये रुजलेला नाही. तो इतिहास पुन्हा आपल्याला वाचायचा असेल तर धनगर समाजाचा गौरवशाली इतिहास हे पुस्तक प्रत्येक घरा-घरामध्ये असणे गरजेचे आहे.बाळासाहेब दोलतोडे ते म्हणाले, निवडणूक आली की धनगर बांधव तुमची झेंडे घेऊन पळतो, पण निवडणुकीत हाच धनगर बांधव पक्षाला तिकीट मागायला लागला तर त्याचा द्वेष करतात व तिकीट देण्याचे टाळले जाते.
आमदार महेश दादांना माझी विनंती आहे कि, येणाऱ्या महानगरपालिकेत किमान दहा नगरसेवकांसाठी तिकिटे द्यावीत. आमदार महेश दादा लांडगे हे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीच्या निमित्ताने या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज मला स्वर्गीय बी. के. कोकरे विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. ज्या पद्धतीने बी.के. कोकरे यांचे धनगर समाजासाठी काम होते
, त्याच पद्धतीचे काम विधानसभेत गाजवण्यासाठी शंभर टक्के पुढे राहील, याची ग्वाही मी देतो. मला सन्मानित केल्याबद्दल या प्रतिष्ठानचे आभार मानतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन वाघमोडे यांनी केले. सूत्रसंचालन अजित चौगुले यांनी तर शिवाजी बिटके यांनी आभार मानले. कार्यक्रमाला पुण्यश्लोक आहिल्यादेवी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दत्ता करे, सुनील बनसोडे, सचिव राजेंद्र सोनटक्के,संघटक नाना गावडे, खजिनदार संजीव रुपनवर व धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.