देशात निवडणूक आयोगाकडून राष्ट्रपतीच्या निवडणुकीची घोषणा

नवी दिल्ली : विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंदयांचा कार्यकाळ पुढील महिन्यात २४ जुलै रोजी संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात निवडणूक आयोगाकडून राष्ट्रपतीच्या निवडणुकीची (Presidential elections) घोषणा करण्यात आली आहे. आज (गुरुवार) मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये या निवडणुकीची घोषणा केली १५ जून रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अधिसुचना निघणार आहे. त्यानंतर २९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. तर ३० जून रोजी अर्जाची छाननी होवून २ जुलै रोजी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असणार आहे.

निवडणूक बिनविरोध झाल्यास २ जुलै रोजीच देशाला नवीन राष्ट्रपती मिळणार आहेत. निवडणूक बिनविरोध न झाल्यास १८ जुलै रोजी मतदान आणि २१ जुलै रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर केला जाणार आहे.

, राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाल्याने आगामी काही दिवसांत केंद्रात राजकीय हालचालींना वेग येणार आहे. सत्तारूढ भारतीय जनता पक्षातर्फे कोण उमेदवार असणार याचा निर्णय भाजप (BJP) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नजिकच्या काळात घेतील. पण यंदा भाजपतर्फे महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल अशी चर्चा आहे. केंद्र व अनेक राज्यांत सत्ता असलेल्या भाजपकडे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील इलेक्ट्रोरल कॉलेजमधील सर्वाधिक मते असली तरी निवडून येण्यासाठीचे आवश्यक संख्याबळ भाजपकडे नाही.

राष्ट्रपतीपदासाठी सर्वसामान्यांना मतदानाचा अधिकार नसतो. केवळ विधानसभा व लोकसभा-राज्यसभेवर निवडून आलेले लोकप्रतिनिधींनाच या निवडणूकीत मतदान करू शकतात व त्यांच्या मतांचे मूल्य विजयी उमेदवार ठरविते. १, २, ३ असे पसंती क्रमांक देवून मतदान करायचे असते. यात खासदारांच्या (MP) मतांच्या किमतीचं वेगळे गणित असते. यामध्ये सर्व राज्यांच्या (विधानसभा) आमदारांच्या मतांचे मूल्य जोडले जाते. या एकत्रित मूल्याला राज्यसभा आणि लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येने भागले जाते. अशा प्रकारे मिळालेली संख्या ही खासदाराच्या मताचे मूल्य असते.राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळणे हे विजय निश्चित करत नाहीत. मतदारांच्या एकूण मतांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे खासदार आणि आमदारांच्या मतांचे वजन (Weightage) प्राप्त करणारा उमेदवार भारताचा राष्ट्रपती होतो.

निवडणुकीसाठी इलेक्टोरल कॉलेजच्या सदस्यांच्या मतांचं एकूण मूल्य १० लाख ९८ हजार ८८२ आहे. यात उमेदवाराला विजयासाठी ५ लाख ४९ हजार ४४१ मते मिळणे आवश्यक आहेदेशात लोकसभा आणि राज्यसभा मिळून एकूण ७७६ खासदार आहेत. प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य ७०० आहे. देशात एकूण ४ हजार १२० विधानसभा आमदार आहेत. प्रत्येक राज्याच्या आमदाराच्या मताचे मूल्य वेगळे असते. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशच्या एका आमदाराच्या मताचे मूल्य सर्वाधिक २०८ आहे. हे मतदान पूर्णतः गुप्त मतदान पद्धतीने होते. त्यामुळे कोणत्याही पक्षाला व्हीप काढता येत नाही. तसेच मत दाखविल्यास ते बाद समजले जाते.

Latest News