जमिनीचा खोटी कागदपत्र बनवून फसवल्या प्रकरणी भाजपचे आमदार जयकुमार गोरेंना हायकोर्टानं दणका…

जमिनीचा खोटी कागदपत्र बनवून फसवल्याचा आरोप प्रकरणी भाजपचे आमदार जयकुमार गोरेंना हायकोर्टानं दणका दिला आहे. जयकुमार गोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टानं फेटाळून लावल्यानं त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

मुंबई उच्च न्यायालयानं या निकालाला दोन आठवड्यांची स्थगिती दिली आहे. त्यामुळं पुढील दोन आठवडे तरी गोरेंविरोधात अटकेची कारवाई होणार नाही. वडूज जिल्हा सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटक टाळण्यासाठी धाव घेतली होती. एका मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्र तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोरेंच्या अटकपूर्व जामीनावर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती वीरेंद्रसिंह बिश्त यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर करत हायकोर्टानं त्यांना दणका दिला आहे. मात्र, या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता यावं यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं या निकालाला दोन आठवड्यांची स्थगिती दिली आहे. दोन आठवडे जयकुमार गोरे यांच्या विरोधात अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गोरेंविरोधात जमिनीचा खोटी कागदपत्र बनवून फसवल्याचा आरोप आहे.

नेमकं प्रकरण काय ?
मायणी गावातील एका जमिनीसंदर्भात बोगस कागदपत्रं तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडीबा घुटूगडे (विरळी), महेश पोपट बोराटे (बिदाल) यांच्यासह एकूण सहा जणांविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात एका तलाठ्याचाही समावेश असून, तो फरार आहे. याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी पोलिसात फौजदारी तक्रार दिली आहे. या गुन्ह्यामध्ये संजय काटकर याला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, याप्रकरणी जयकुमार गोरे यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी वडूज सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, तो न्यायालयानं फेटाळल्यानंतर गोरे यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी आपण कोणतीही फसवणूक केलेली नसल्याचा दावा जयकुमार गोरे यांच्या वतीनं कोर्टापुढे करण्यात आला होता.

Latest News