पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस चे भाजप सरकार आणि वाढत्या महागाई विरोधात बाजार आंदोलन…


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना शहर राष्ट्रवादी काँग्रेसला करण्यात आली आहे. त्याअंतर्गत महागाई विरोधात आंदोलन घ्यावे, अशी मुख्य सूचना शहर पदाधिकाऱ्यांना करण्यात आली होती.
त्यानुसार मोदी महागाई बाजार हे अनोखे आंदोलन जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानासमोर बुधवारी करण्यात आले. आंदोलकांनी चक्क रस्त्यावर भाजी विक्रेते, फळविक्रेते, मासे विक्रेते, वडापावची गाडी चालविणारे, फुलविक्रेते, चहाविक्रेते आदींनी त्या-त्या वस्तूंचे स्टॉल लावत सर्वसामान्यांना महागाईचा कसा फटका बसतो, या बाबत घोषणा करत मोदी सरकारचा निषेध केला.
‘मोदी सरकारने काय दिले? गाजर दिले, गाजर दिले..’ ‘वारे मोदी तेरी सरकार दारू सस्ती महंगा तेल’.. मोदी सरकार महागाईचा भस्मासूर अशा विविध घोषणांनी पुण्यात संभाजी उद्यानासमोरील परिसर दुमदुमला. निमित्त होते राष्ट्रवादी काँग्र्रसने भाजप सरकार आणि वाढत्या महागाई विरोधात केलेले बाजार आंदोलन.
यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर भाजी विक्री करत महागाई विरोधात घोषणा दिल्या.मोदी सरकारच्या राज्यात महागाई वाढत आहे, पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत. नागरिकांचा यात मानसिक, आर्थिक छळ होत आहे असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला. मोदी सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाही, त्यामुळे आम्ही हे निषेध आंदोलन करत असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. आश्वासनांचे गाजर दाखवून मोदींनी महागाई वाढवून सामान्य नागरिकांचा भाजप सरकारने छळ केला आहे.
यामुळे हे महागाईचा बाजार आंदोलन केले असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी यावेळी दिली.देहू येथील शिळा मंदिराचे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी राजशिष्टाचाराप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या ठिकाणी उपस्थित होते. प्रोटोकॉल प्रमाणे त्यांना भाषण करू देणे अपेक्षि होते. मात्र, हे सरकार त्यांना घाबरले आणि त्यामुळेच त्यांना भाषण करू देण्यास नाकारण्यात आले, असा आरोप आंदोलकांनी करत या कृतीचा निषेधही या आंदोलना दरम्यान केला.
आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, शहर प्रवक्ता प्रदीप देशमुख, उदय महाले, वनराज आंदेकर, वैशाली थोपटे, मोनाली गोडसे, अजिंक्य पालकर, सौरभ गुंजाळ यावेळी उपस्थित होते.