राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना मुंबईत पोचण्याचे आदेश

मुंबई :. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा झालेल्या पराभावाने आघाडीतील सर्वच पक्ष सतर्क झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीत आपल्याकडील मतांची फाटाफूट होऊ नये, यासाठी प्रत्येक पक्ष काळजी घेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातून फोन गेले असून शनिवारपर्यंत (ता. १८ जून) मुंबईत पोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार या मतदानासंदर्भातील सूत्रे हाताळत आहेत. त्यांना पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे सहकार्य मिळत आहे. मतदानाला अजून तीन दिवस असले तरी येत्या शनिवारपर्यंत मुंबईत दाखल होण्याचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना देण्यात आलेले आहेत. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाकडून या सर्व आमदारांना फोन आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली

राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या २० जून रोजी मतदान होणार आहे. विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे तीनच दिवस बाकी राहिले आहेत. राज्यसभा निवडणुकीत झालेला धोका टाळण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडून विशेष काळजी घेतली जात आहे.

विशेष म्हणजे विधान परिषदेला गुप्त मतदान असल्याने महाआघाडीची चिंता वाढली आहे. हे तीनही पक्ष आपापल्या आमदारांना स्वतंत्रपणे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणार आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनीदेखली आपापल्या परीने संपर्क साधण्यास सुरूवात केली आहे. रामराजे आणि खडसे यांनीही अपक्ष आमदारांना मतदानासाठी मुंबईत येण्याची विनंती करण्यात येत आहे

. ही दोन्ही ज्येष्ठ नेते असल्याने त्यांना मतदान व्हावे, यासाठी पक्षाकडून रणनीती आखण्यात येत आहे.राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे आमदार एकाच हॉटेलमध्ये होते. आता मात्र, तीनही पक्षांनी आपापले उमेदवार वेगवेगळ्या हॉटेलमध्ये स्वतंत्रपणे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Latest News