कुर्ला इमारत दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री निधीतून 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई


मुंबई :. मुंबईतल्या कुर्ला परिसरातल्या नाईक नगरसोसायटीतील जुन्या धोकादायक इमारतींमधल्या तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळून त्यात १४ जणांचा मृत्यू झाला. तर १३ जण जखमी झाले असून त्यातील ९ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुर्ला येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचं जाहीर केलं आहे. जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचेही निर्देश दिले आहेत
चार जणांवर राजावाडी आणि सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही इमारत ४९ वर्ष जुनी असून ती धोकादायक स्थितीत होतीरात्री पावणे बाराच्या सुमारास अचानक खचली आणि काही क्षणातच इमारतीचा भाग कोसळून काहीजण ढिगा-याखाली दबले गेले. तर काही इमारतीच्या धोकादायक भागात अडकले. स्थानिक रहिवासी व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन अडकलेल्यांची सुटका केली. मात्र यात १४ जणांचा जीव गेला.
दरम्यान बाजूच्या इमारतीतील रहिवाशांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.कुर्ला इथली एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनी या दुर्घटनाग्रस्तांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसंच त्यांच्यासाठी मदतही जाहीर केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे.