लिटल फ्लॉवर स्कुल व भारतीय विद्यानिकेतन प्रशालेत गुरुपौर्णिमा विविध उपक्रमांनी साजरी


लिटल फ्लॉवर स्कुल व भारतीय विद्यानिकेतन प्रशालेत गुरुपौर्णिमा विविध उपक्रमांनी साजरी
पिंपरी, प्रतिनिधी :
जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम प्राथमिक व माध्यमिक स्कुल आणि भारतीय विद्यानिकेतन प्रशालेत गुरुपौर्णिमा विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. गुरूपूजन व वृक्षपूजन करीत विद्यार्थ्यांनी गुरूंना वंदन केले.
संस्थेच्या अध्यक्षा आरती राव आणि सचिव प्रणव राव यांच्या हस्ते सरस्वती पूजन व वेद व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूजा पोटपल्लीवार, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम माध्यमिकच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतन प्रशालेच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, शिक्षिका मनिषा घुले, निकिता आडसुळे, प्रिती पितळे, सुमित्रा कुंभार, प्रीती पाटील, वृषाली कोकणे, कीर्ती शिंपी, ज्येष्ठ नागरिक संघाचे अशोक चव्हाण, ईश्वर चौधरी, चंद्रकांत चोपडे, संभाजी मनोकर तसेच शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी भाषणातून गुरूंचे महत्त्व सांगितले. विद्यार्थी व शिक्षकांच्या हस्ते वृक्षपूजन झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषेतील वक्तृत्वातून विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवून दिले. आठवीच्या विद्यार्थ्यांनी गुरुचे महत्त्व मनमोहक नृत्यातून सादर केले. ‘गुरु ईश्वर तात माय’ या गाण्याच्या सादरीकरणातून सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी गुरुप्रती श्रद्धा व भक्ती व्यक्त केली. तसेच स्वरूप पवार, श्रेया काला, भक्ती खलसे, ओम भिटे व अंकिता राय या विद्यार्थ्यांनी गुरुविषयी भावना व्यक्त केल्या.
विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाचे विशेष कौतुक करीत आरती राव यांनी सांगितले, की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गुरुचे स्थान खूप उच्च दर्जाचे व महत्त्वाचे आहे. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा आहे, त्यांचा आदर करावा, असे आवाहन केले. प्रणव राव यांनी सांगितले, की प्रथम गुरु आपले आई वडील म्हणून त्यांचा नेहमीच मान राखला पाहिजे.
मुख्याध्यापिका पूजा पोटपल्लीवार, नीलम पवार, आशा घोरपडे यांनी गुरुंचे आपल्या जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. आपली प्रथम गुरु आई असून, तिचा नेहमी आदर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांची मोठ्या सन्मानाने पूजा करीत त्यांचे आशीर्वाद घेतले. दरम्यान, सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांची नावे यावेळी जाहीर करण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण शिक्षिका वृषाली कोकणे व कीर्ती शिंपी यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीति पाटील, ज्योती मोरे, अनुष्का भोसले, सायली जोगी यांनी, तर आभार सुमित्रा कुंभार, सुमय्या वर्मा यांनी मानले.

