नामांतराचा निर्णय ठाकरे सरकारचा बेकायदेशीर,: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुंबई ::. महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्याचा किंवा त्या निर्णयांना स्थगिती देण्याचा निर्णयांचा सपाटाच शिंदे सरकारने लावला आहे. आघाडी सरकारने (thackeray government) शेवटच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या तीन महत्वाच्या निर्णयांना शिंदे सरकारनं स्थगिती दिली आहे.”आघाडी सरकारची शेवटची कॅबिनेट बेकायदेशीर होती, उद्या आम्ही मंत्रीमंडळाच्या बैठकीत या तीन निर्णयावर शिक्कामोर्तब करणार आहोत,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. मुंबईत एका कार्यक्रमात ते बोलत होते. “सरकार अल्पमतात असताना त्यांनी नामांतराबाबत बेकायदा निर्णय घेतला,” असे शिंदे म्हणाले.
औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दि. बा. पाटील असं नामांतर करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. राज्यपालांनी बहुमत चाचणी सिद्ध करायचं पत्र दिल्यानंतर असा धोरणात्मक आणि लोकप्रिय निर्णय घेता येत नसल्याचा आक्षेप घेतल्यानेच या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आघाडी सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतला होता. हे तीनही निर्णय शिंदे सरकार पुन्हा नव्याने घेणार आहेत. औरंगाबादच्या नामांतराला एमआयएमचे नेते,खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. त्यांनी या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. “नामांतराचा घाईत घेतलेला निर्णय चुकला आहे,” असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
“औरंगाबाद शहराची जगभरात ऐतिहासिक ओळख आहे. केवळ हिंदुत्व हा मुद्दा दाखवण्यासाठी आणि बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे कुणाच्याही आजोबांच्या इच्छेसाठी औरंगाबादचे नामांतर होऊ देणार नाही. यासाठी कायदेशीर लढाई उभारली जाईल, गरज पडल्यास रस्त्यावर सुद्धा उतरु,” असा इशारा जलील यांनी दिला आहे.