म्युनिसीपल ई- क्लासरूम प्रकल्पांतर्गंत १०० मनपा शाळांमधील शिक्षकांनी घेतले तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

IMG-20221130-WA0173

*म्युनिसीपल ई- क्लासरूम प्रकल्पांतर्गंत १०० मनपा शाळांमधील शिक्षकांनी घेतले तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण**तंत्रज्ञान संदर्भात असलेल्या शंकांचे निराकरण झाल्याचे शिक्षकांकडून समाधानाची भावना व्यक्त*

पिंपरी, ३० नोव्हेंबर २०२२ :‍ पिंपरी चिंचवड महानगरपालिका व स्मार्ट सिटी अंतर्गत सूरू असलेल्या ई-क्लास रूम प्रकल्पांतर्गत १०० मनपा शाळांमधील शिक्षकांना तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण देण्यात आले.

शाळांच्या मागणीनूसार १२ वर्गाद्वारे ३५० शिक्षकांनी डिजिटल कॉन्टेंट, कम्पुटर लॅब ऑपरेटींग, स्टीम लॅब (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) तसेच रोबोटीक लॅब आणि कॅमेरे सूरू करण्याबाबतचे प्रशिक्षण घेतले. तसेच, शिक्षकांच्या शंकांचे निराकरण प्रशिक्षण कार्यक्रमावेळी करण्यात येत आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या सूचनांनूसार अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपायुक्त संदीप खोत, सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी मार्फत म्युनिसीपल ई-क्लासरूम प्रकल्प पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १२३ शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी २ टप्प्यात करण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यात ११ शाळांमध्ये प्राथमिक तत्वावर अंमलबजावणी करण्यात आली होती.

तसेच प्रकल्पाच्या दुस-या टप्प्याचे कामकाज ११२ शाळांमध्ये पूर्ण झाले आहे. प्रकल्पामध्ये संगणक कक्ष, डिजीटल ई-लर्निंग प्लॅटफॉर्म, वायफाय एक्सेस पॉईंट, एलईडी डिस्प्ले, एचडी कॅमेरा, व्हीडीओ रेकॉर्डींग, शैक्षणिक विश्लेषण सॉफ्टवेअर, रोबोटिक्स लॅब (विज्ञान तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित), गणित, इंग्रजी आणि विज्ञानासाठी तज्ञ शिक्षकांची नियुक्ती, प्रकल्प व्यवस्थापन आणि हेल्प डेस्क सेवा, ऑनलाइन डॅशबोर्ड आदी बहुतांश घटकांचा समावेश आहे.

या प्रकल्पांतर्गत १००० वर्ग खोल्यांमध्ये एलईडी डिस्प्ले, कम्पुटर, कॅमेरे बसविण्यात आलेले असून मनपा शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. म्युनिसीपल ई-क्लासरूम प्रकल्पाचा सुमारे ४४ हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. मे. इडिक आणि केपीएमजी सल्लागार कंपनीच्या प्रतिनिधींद्वारे शिक्षकांना मार्गदर्शन देण्यात येत आहे.

यामध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू शाळांचा समावेश असून मुख्याध्यापक कक्षातून विद्यार्थ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि समस्या निराकरणास मदत होणार आहे.

Latest News