पुणे महापालिकेत कोरोना काळात ‘रॅपिड अँटीजन कीट’मध्ये 80 लाखाचा घोटाळा…


पुणे- ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
पुण्याच्या महापालिकेच्या आरोग्य खात्याची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.पुण्यातून कोरोना काळात ‘रॅपिड अँटीजन कीट’मध्ये मोठा घोटाळा झाला आहे. वारजे माळवाडी पोलिसांच्या प्राथमिक तपासातही हा प्रकार निष्पन्न झाला असून, तसे पत्रही वारजे पोलिसांनी महापालिकेला दिले आहे.शासनाकडून महापालिकेला कोरोना तपासणीसाठी मिळालेल्या रॅपिड अँटीजन कीटमध्ये लाखोंचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
वारजे येथील महापालिकेचे डॉक्टर अरविंद बारटक्के दवाखान्यातील स्वॅब सेंटरवर 18 हजार तपासणी कीट पैकी 60 ते 80 टक्के कीट रुग्णांसाठी न वापरता त्यांची परस्पर विक्री करण्यात आली आहे. दरम्यान त्या जागी तब्बल 11 हजारांहून अधिक बोगस रुग्णांच्या नोंदी देखील करण्यात आल्या आहेत.तसेच या घोट्याळातून 34 लाख रुपये लाटल्याचं समोर आलेलं आहे. तसे पत्रही पोलिसांनी महापालिकेला दिले आहे.तर,तक्रारदाराच्या मते ही रक्कम 80 ते 90 लाख रुपये आहे.
या भ्रष्टाचाराला बारटक्के दवाखान्यातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कोळसुरे यांनी आरोग्य यंत्रणेकडे आणि पोलिसांसह 32 ठिकाणी तक्रार करत या प्रकरणाला वाचा फोडली आहे. हा प्रकार जानेवारी ते डिसेंबर 2021 दरम्यान घडला आहे. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार आणि वारजे पोलिसांच्या तपासानुसार या घोटाळ्याचा ठपका ठेवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहे.