2024 ला नक्कीच बदल होईल- उध्दव ठाकरे


( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )- प्रत्येकालाच नव्या स्वातंत्र्याची व क्रांतीची मशाल पेटवायची आहे, पण लोकनायक जयप्रकाश नारायण होणे आता सोपे नाही. डोके ठिकाणावर ठेवून जमिनीवरील सत्य समजून पावले टाकावी लागतील. तसे घडले तर २०२४ ला नक्कीच बदल होईल. नाही तर शंभर आचारी रस्सा भिकारी असेच घडेल! अशा शब्दांत ठाकरे गटानं विरोधकांची कानउघडणी करतानाच महत्वपूर्ण सल्लाही दिला आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणातील सत्ताधारी पक्ष भारत राष्ट्र समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विरोधी पक्षांचं शक्तीप्रदर्शन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांसारखे आदी नेते उपस्थित होते.
यावेळी राव यांनी त्यांच्या भाषणात भाजपला पर्याय म्हणून विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत असे प्रतिपादन केले होते. भाजपचा सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांची एकजूटीवर भाष्य करण्यात आलं आहे. तसेच २०२४ च्या निवडणुकांना सामोरे जाताना विरोधकांची एकजूट किती महत्वाची आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे
देशातील विरोधी पक्षांची नेमकी दिशा काय असा प्रश्न आता पडला आहे. काँग्रेस पक्षाच्या खासदारांचा आकडा शंभर पार करणे गरजेचं आहे व आज ही क्षमता फक्त काँगेसमध्येच आहे. काँगेस शंभर पार झाली की दिल्लीतील सध्याचा डोलारा सहज कोसळेल. याचे भान राष्ट्रीय राजकारणात उडी मारणाऱ्या प्रत्येकाने ठेवायला हवे.
काँगेसला वगळून किंवा काँग्रेसला लांब ठेवून विरोधी आघाडी करता येणे शक्य नाही. जे अशा विचाराने मेळावा भरवून राष्ट्रीय राजकारणाचा एल्गार करीत आहेत, ते एकप्रकारे भारतीय जनता पक्षाचा २०२४ चा मार्ग मोकळा करीत आहेत अशी चिंताही ठाकरे गटाकडून सामनाच्या अग्रलेखाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.
या सगळ्यांना भाजपपेक्षाही काँग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकाचा राजकीय शत्रू वाटतो व हा विचार विरोधकांच्या कोणत्याही आघाडीस मजबुती देणारा नाही.अखिलेश, केजरीवाल, विजयन, नितीशकुमार यांना कुणाशी लढायचे आहे? काँग्रेसला दुबळे करून हे लोक भाजपशी कसे लढणार? विषय फक्त निवडणुकांचा नाही, तर देशात फोफावलेल्या हुकूमशाही प्रवृत्तीचा आहे.
न्यायव्यवस्थेपासून देशातील सर्वच प्रमुख स्तंभांवर हल्ले सुरू आहेत. संविधान, न्यायालयाचेही खासगीकरण सुरू असताना विरोधकांची तोंडे दहा दिशांना कशी राहू शकतात? त्यांचे पाय दोन. त्यामुळे रस्ता एकच, पण दहा डोकी व दहा तोंडांनी बोलणे, विचार करणे सुरू असल्याचं म्हटलं आहेलोकसभा व विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुका जिंकण्यासाठी आत्तापासूनच भाजपनं कंबर कसली आहे
. याचदरम्यान आता विरोधकांकडून सत्ताधारी भाजपसमोर तगडं आव्हान उभं करण्यासाठी विरोधी पक्षांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. मात्र, यात काँग्रेसला वगळून विरोधकांकडून आघाडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावरुनच शिवसेनेचं (उध्दव बाळासाहेब ठाकरे) मुखपत्र असलेल्या सामनातून विरोधकांची कानउघडणी करण्यात आली आहे
तसेच भाजप हा राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनं डचमळला आहे. यात्रा विस्कळीत व्हावी म्हणून कोरोनाचे भय घातले, पण विरोधी पक्षाला दचकायला काय झाले? समस्त विरोधी पक्ष एकदिलाने एकत्र येण्याची हीच वेळ आहे. प. बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, बिहार, केरळ, राजस्थान अशा राज्यांनी मनावर घेतले तर इतर राज्यांतही जागरण होईल.