जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्याभाजपचा पराभव निश्चित !युवा नेते रोहित पाटील यांचे भाजपच्या कारभारावर ताशेरे


जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्याभाजपचा पराभव निश्चित !युवा नेते रोहित पाटील यांचे भाजपच्या कारभारावर ताशेरे
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – देशाला रसातळाला पोहोचवण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले आहे. पेट्रोलचे भाव शंभराच्या पुढे गेले आहेत. गॅस सिलिंडरचे भाव हजाराच्या पार गेले आहेत. घरचे बजेट कोलमडले आहे. पण ही महागाई कमी करण्यासाठी सरकार कोणतीही पावले उचलत नाही. त्यामुळे जगायचं कसं? असा प्रश्न सध्या सामान्य माणसाला पडला आहे. जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या आणि भ्रष्टाचारातून जमा केलेल्या खोक्यांच्या माध्यमातून लोकशाहीच धोक्यात आणणाऱ्या भाजपला पराभवाचा धक्का चिंचवडच्या पोटनिवडणुकीत नक्कीच बसणार असून महाविकास आघाडीचे नाना काटे विजयी होतील, असा विश्वास स्वर्गीय आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी व्यक्त केला.नाना काटे यांच्या प्रचारार्थ रहाटणी, वाकड, थेरगाव परिसरात आयोजित करण्यात आलेल्या पदयात्रेदरम्यान मतदारांशी संवाद साधताना रोहीत पाटील बोलत होते
. पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘सामान्य माणसाला देशाच्या, राज्याच्या हिताचा विचार करायला वेळच मिळू नये, अशी परिस्थिती भारतीय जनता पक्षाने निर्माण केली आहे. उद्योग क्षेत्र दोन कुटुंबांकडे एकवटले जाण्याची भीती आहे. सामान्य माणसाला आपल्या रोजी रोटीची खात्री राहिली नाही. पिचलेल्या सामान्य माणसांना उभारी देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणाविरोधात कणखरपणे उभे राहण्याची गरज आहे.’.
सामान्य माणसाच्या मनामध्ये या सरकारच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या लालचीपणाविषयी प्रचंड राग आहे. हा राग मतपेटीतून नक्की बाहेर येईल आणि नाना काटे यांचा विक्रमी मतांनी विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागरिकांची आणि श्रमिकांची पिळवणूक सुरु आहे. त्याविरूध्द दाद मागितली तर आज ताटात येणारी भाकरही जाण्याची भीती वाटत आहे,
या साऱ्यामागे सरकारचा संवेदना नसलेला कारभार कारणीभूत आहे, त्याच्या विरोधात असणारा असंतोष व्यक्त करण्यासाठी संधी या निवडणुकीच्या माध्यमातून सामान्य मतदारांना मिळाली आहे. त्यामुळे या संधीचा वापर जनता नक्की करेल, असा विश्वास रोहीत पवार यांनी यावेळी व्यक्त केला.