सामान्य जनतेचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याचा भाजपचा प्रयत्न – जयंत पाटील


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – चिंचवड (प्रतिनिधी) – देशाची राज्यघटना धोक्यात आली आहे. बीबीसी सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेवर धाड टाकून खरी माहिती दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. सामान्य माणसांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मताचा अधिकार काढून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, खोक्यांच्या जोरावर पक्षाचे नाव, चिन्ह चोरी केली जात असल्याने लोकशाही वाचविण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर आली आहे. पोटनिवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही वाचविण्याची आणि भाजपला धडा शिकविण्याची आपणाला संधी प्राप्त झालेली असल्याने, नाना काटे यांना बहुमताने विजयी करा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रहाटणी येथे झालेल्या सभेत केले.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते भास्कर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे, जयंत पाटील, सुभान अली शेख यांच्या सभेचे रहाटणी येथे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नाना काटे यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे नेते व माजी मंत्री भास्कर जाधव, राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे, राष्ट्रवादीचे निरीक्षक व मावळचे आमदार सुनील शेळके, युवा नेते रोहित आर.आर. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांकचे प्रदेश सचिव सुभान अली शेख, सारंग श्रीनिवास पाटील, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सभेस माजी आमदार व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले, उपशहरप्रमुख रोमी संधू, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस रविकांत वरपे, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा सायली नढे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेविका शीतल नाना काटे, लताताई ओव्हाळ, सुलक्षणा धर, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक मयुर कलाटे, तुषार कामठे, विक्रांत लांडे, शंकर काटे, राजू लोखंडे, राजू मिसाळ, पंकज भालेकर, धनंजय भालेकर, शाम लांडे, फझल शेख, संतोष कोकणे, विनोद नढे, राहुल भोसले, गोरक्ष लोखंडे, खंडूशेठ कोकणे, माई काटे, उषा काळे, संगीता ताम्हाणे, राजेंद्र जगताप, शमीम पठाण, पुणे शहर महिला शहराध्यक्षा स्वाती पोकळे, राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्षा वर्षा जगताप, युवक अध्यक्ष इम्रान शेख, सेवादलाचे अध्यक्ष महेश झपके, प्रदेश सरचिटणीस प्रशांत सपकाळ, युवा नेते शाम जगताप, पिंटू जवळकर, विशाल पवार, प्रशांत दिलीप सपकाळ, सागर कोकणे, कविता खराडे, मनीषा गटकळ, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय अवसरमल, संदीप पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी शहराध्यक्ष यश साने आदी उपस्थित होते. सभेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
जयंत पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, नाना काटे यांचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आपल्याला आता केवळ मताधिक्य वाढवायचे आहे. राहुल कलाटे यांची उमेदवारी ही विरोधकांची मते विभागण्यासाठी भारतीय जनता पक्षानेच केलेली खेळी आहे. याची माहिती प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले. सीमेवर काही घडले ती माहिती लोकांपर्यंत पोहोचू नये, महागाई किती वाढली तरी त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचू नये, याची व्यवस्था आणि तयारी भारतीय जनता पक्षाने बीबीसीवर छापा टाकून केली आहे. त्यामुळे त्यांना हवी तीच माहिती मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून बाहेर येणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना घरात जाऊन या गोष्टीची माहिती करून देण्याची आवश्यकता आहे.
जयंत पाटील पुढे म्हणाले, अजित पवार यांनी या भागाचा देशात सर्वाधिक विकास केला आहे. हा भाग आयटी हब होण्यासाठी शरद पवार व अजित पवार यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या दूरदृष्टीनेच पिंपरी-चिंचवड समृद्ध झाले आहे. हे नागरिकांपर्यंत पोहोचवले गेले पाहिजे. देशातील लोकशाही संपविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे ही निवडणूक ही देशातील लोकशाही टिकविण्यासाठी महत्त्वाची निवडणूक आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राज्यात झालेल्या सर्व पोटनिवडणुका महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. त्यामुळे ही निवडणुकही आपण जिंकणार आहोत, कोकण, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील मतदारांचा आपल्याला पाठिंबा मिळणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आपापल्या वॉर्डामध्ये अधिकाधिक मताधिक्य मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.