धंगेकरांच्या पाठीशी उभे रहा शरद पवारांचे खेळाडूंना आवाहन…


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – बालेवाडी येथील जागेवर स्टेडियम उभारणीची मुहुर्तमेढ १९९४ साली रोवली. त्या ठिकाणाहून येता जाता अस्वस्थ होते. ऐवढे मोठे स्टेडियम असूनही सर्वसामान्य घरातील खेळाडूला सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. अर्थकारण मोठे झाले असून ही परिस्थिती बदलणे गरजेची असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खेळाडूंशी चर्चा करतांना आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या पाठीशी उभे राहा असे आवाहनही त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले, क्रिकेटपटुंसह इतर खेळातील खेळाडूंसाठी पेन्शन योजना सरकारच्या माध्यमातून सुरु केली. अनेक खेळाडू मोठे होताना पाहिले असून खेळाडूंच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमीच तयार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कसबा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ खेळाडूंच्या मेळावा आणि सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उमेदवार रविंद्र धंगेकर, खासदार अॅड. वंदना चव्हाण, अंकुश काकडे, अॅड. अभय छाजेड, रोहित टिळक, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दिपक मानकर, काका पवार, यांसह शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त, अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू, मार्गदर्शक आणि आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पवार म्हणाले, म्हाळुंगे-बालेवाडी येथे शिवछत्रपती क्रीडा संकुल उभारण्यात आले. कालांतराने स्टेडियममध्ये अर्थकारण शिरल्याने सर्वसामान्य खेळाडू या सुविधांपासून वंचित राहत आहे.
याप्रसंगी वसंत बोर्डे-सातव, रोलर स्केटिंगपटू वैदेही सरोदे, मल्लखांबपटु सत्यजित शिंदे, अर्जुनवीर शांताराम जाधव, अर्जुनवीर श्रीरंग इनामदार, दिपक मानकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रास्ताविक अॅड. अभय छाजेड यांनी केले. सूत्रसंचालन शिल्पा भोसले यांनी तर शांतीलाल सुरतवाला यांनी आभार मानले.