पुणेकर सुज्ञ आहेत -शरद पवार


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
महाराष्ट्रात उद्धव ठाकारे यांच्या हातातील सत्ता भाजपाने काही लोकांनी हिसकावून घेत आपली सत्ता स्थापन केली. पंजाब, हरयाणा, दिल्ली, आंध्रप्रदेश यासह देशात साठ टक्के ठिकाणी भाजपाला नागरिकांनी नाकारले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसविण्याचे निर्णय सध्या घेण्यात येत आहे. देशाच्या अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी महाविकास आघाडीला नागरिकांनी पाठबळ देण्याची गरज आहे. कसबा विधान मतदार संघातील पोटनिवडणूक महाराष्ट्राला दिशा देणारी आहे. पुणेकर सुज्ञ आहेत. ते योग्यच निर्णय घेणार आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यापारी मेळाव्यात सांगितले.
कसबा विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्राचारार्थ बुधवारी गुरुवार पेठेतील जयराज भवन येथे व्यापारी बांधवाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पवार बोलत होते. माजी आमदार मोहन जोशी, माजी आमदार उल्हास पवार, खासदार अॅड. वंदना चव्हाण, माजी महापौर अंकुश काकडे, अभय छाजेड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे, ज्येष्ठ व्यापारी वालचंद संचेती, पोपटलाल ओसवाल, जनकजी व्यास, राजेश शहा, देवीचंद भंसाळी, महेंद्र पितळीया, भोलासाहजी अरोरा, नितीन ककाडे, रुपाली ठोंबरे, भोला वांजळे यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पवार म्हणाले, कसबा विधानसभा मतदार संघातील ही पोटनिवडणूक महाराष्ट्राला दिशा देणारी आहे. पुणेकर सुज्ञ आहेत. ते योग्यच निर्णय घेतील. व्यापारी वर्ग हा देशाचा जाणकार वर्ग असून त्याला देशाच्या अर्थव्यवस्थेची नाडी कळते. मात्र अर्थव्यवस्थेबाबत काहीही विचार न करता नको ते निर्णय घेतले जात आहेत. त्याचा फटका व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे देशाच्या दृष्टीने घेण्यात येणारा कोणताही निर्णय अर्थव्यवस्थेला धक्का बसविणारा नको. हिंदुस्थानचा नकाशा पाहिल्यास ६० टक्क्यांपेक्षा अधिक राज्ये भाजपच्या ताब्यात नाहीत. याचा अर्थ लोकांची मानसिकता भाजपला निवडून देण्याची नाही. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या हातातील सत्ता काही लोकांनी हिसकावून घेतली. अन्यथा इथेही भाजपचे सरकार नव्हते. धंगेकर म्हणाले, माझ्या आत्तापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत व्यापारी वर्गाचा मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांचे मला यापुढे सहकार्य राहील, असा मला विश्वास आहे. प्रास्ताविक अभय छाजेड यांनी केले.